Overspeeding Car Accident | भरधाव मोटारीने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर 
कोल्हापूर

Overspeeding Car Accident | भरधाव मोटारीने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर

नववर्षाच्या पहाटे तावडे हॉटेल चौकात शेकोटीजवळ उभारलेल्यांवर काळाचा घाला; मद्यधुंद चालक ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेलजवळील चौकात कोल्हापूरहून कराडकडे जाणार्‍या भरधाव मोटारीने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेत मेंढपाळ गंभीर जखमी झाला. गुरुवारी पहाटे नववर्षाच्या प्रारंभाला भीषण दुर्घटना घडली. दिलीप अण्णाप्पा पवार (वय 63, रा. वळिवडे रोड, गांधीनगर), सुधीर कमलाकर कांबळे (41, रा. घरनिकी, ता. आटपाडी, जि. सांगली), विनयसिंह गौंड (24, रा. मध्य प्रदेश) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. मेंढपाळ नवना नारायण शेळके (45, रा. धनगर गल्ली, कागल) हे गंभीर जखमी झाले असून, प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने मोटार चालवून तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मुकेश अरुण अहिरे (29, रा. मूळ गाव निमगाव, जि. जळगाव, सध्या रा. रमणमळा, कोल्हापूर) यास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहाटे तावडे हॉटेलजवळील चौकात बसस्थानकावर एस.टी. बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या चार प्रवाशांना भरधाव मोटारीने चिरडल्याने घटनास्थळी पोलिस यंत्रणेसह नागरिकांची मोठी गर्दी झाली. तावडे हॉटेलसमोरील चौकात, रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात तडफडणार्‍या जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तिघांचा वाटेतच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

मेंढपाळ नवना शेळके यांना गंभीर इजा झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. अतिदक्षता विभागात त्यांना हलविण्यात आले. शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांच्यासह शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे, बचाव पथकातील जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मोटारचालक मुकेश अरुण अहिरे यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, अपघातात ठार झालेले दिलीप पवार हे कामानिमित्ताने पहाटे चार वाजता गांधीनगर येथील घरातून बाहेर पडले होते. परगावी जाण्यासाठी तावडे हॉटेलजवळ चौकालगत असलेल्या बसथांब्यावर थांबले होते. घरनिकी (ता. आटपाडी) येथील सुधीर कांबळे व्यवसायाने चालक आहेत. गांधीनगर येथे वास्तव्याला असलेली पत्नी वैशाली व दोन लहान मुलांना भेटण्यासाठी कांबळे बुधवारी दुपारी गांधीनगरला आले होते.

आटपाडीला जाण्यासाठी ते पहाटे साडेचारला तावडे हॉटेल चौकातील बसथांब्यावर आले होते. तर, मध्य प्रदेशातील विनयसिंह गौंड हा तरुण नोकरीच्या शोधात मध्यरात्री कोल्हापुरात आला होता. तो बराच काळ तावडे हॉटेल चौकात थांबला होता. शिवाय, मेंढपाळ नवना शेळकेही बसस्थानक परिसरात थांबले होते. सांगली व सातार्‍याकडे जाणार्‍या एस.टी. बसच्या प्रतीक्षेत चौघेही बसस्थानकाजवळ थांबले होते. पहाटे दाट धुके आणि काळोख असल्यानेही चौघेजण बसस्थानकाजवळ केलेल्या शेकोटीजवळ थांबले होते. पहाटे पाचच्या सुमाराला कोल्हापूरहून कराडकडे जाण्यासाठी भरधाव मोटार बसस्थानकाजवळ आली. मोटार भरधाव असताना चालक मुकेश अहिरे याचा अ‍ॅक्सिलेटरवर पाय पडला. जोरात दाब पडल्याने मोटारीचा वेग प्रचंड वाढला. चालकाचा ताबा सुटल्याने मोटार वेगाने गोल फिरली. त्याच क्षणी शेकोटीजवळ थांबलेल्या दिलीप पवार, सुधीर कांबळे,विनयसिंहसह मेंढपाळ नवना शेळके कारखाली चिरडले गेले. चौघांच्या अंगावरून भरधाव मोटार गेल्याने चौघेही काही अंतर मोटारीसह फरफटत गेले.

बसस्थानकाजवळ थांबलेल्या अन्य काही नागरिकांनी आरडाओरड केली. चालकाला मोटार थांबविण्यास भाग पाडण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झालेले चारही प्रवासी रस्त्यावर निपचित पडले होते. नागरिकांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यासह पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. काही वेळेत पोलिस यंत्रणेसह बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर तडफडणार्‍या चौघांनाही उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वी तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

घरनिकी येथील कुटुंबाचा संसार क्षणात उद्ध्वस्त झाला

आटपाडी तालुक्यातील घरनिकी येथील सुधीर कांबळे यांची परिस्थिती अत्यंत बेताची... दुष्काळामुळे सुधीर छोटी-मोठी कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांची दोन मुले आठवी आणि पाचवीच्या वर्गात शिक्षण घेतात. गरिबी आणि मुलांच्या शिक्षणासाठी पत्नी वैशाली गांधीनगर येथील माहेरी राहते. पत्नी व मुलांना भेटण्यासाठी सुधीर महिन्यातून एकवेळ गांधीनगरला येत असत. भरधाव मोटारीने चिरडल्याने सुधीर कांबळे यांचा मृत्यू झाला. भीषण अपघातात कांबळे कुटुंबीयांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला. पत्नी व मुलांचा आक्रोश काळीज हेलावणारा होता.

चालकाला ‘थर्टी फर्स्ट’ची पार्टी भोवली

भीषण दुर्घटनेला कारणीभू्त ठरलेला मोटारचालक मुकेश अहिरे मूळचा जळगाव जिल्ह्यातला. अनेक वर्षांपासून त्याचे आई-वडिलांसह मुंबईत वास्तव्य आहे. मुकेश स्वत: इव्हेंटची कामे घेतो. कोल्हापुरातील रमणमळा परिसरात त्याने फ्लॅट भाड्याने घेतला आहे. तिथे त्याचे वास्तव्य असते. इव्हेंटची कामे करणार्‍या कराड येथील कामगारांना आणण्यासाठी अहिरे मोटारीतून पहाटे कराडला चालला होता. बुधवारी रात्री त्याने फ्लॅटवर थर्टी फर्स्ट साजरा केला. पहाटेपर्यंत त्याचा जल्लोष सुरू होता. डोळ्यांवरील झापड आणि रस्त्यावर काळोख, यामुळे त्याचा भरधाव मोटारीवरील ताबा सुटला आणि भीषण दुर्घटना घडली.

नातेवाईकांचा आक्रोश

तावडे हॉटेलजवळील भीषण अपघातात सामान्य घरातील कुटुंबप्रमुखांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवारांना मोठा धक्का बसला होता. दिलीप पवार, सुधीर कांबळे यांच्यासह जखमी नवना शेळके यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळासह शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली. पवार व कांबळे यांच्या कुटुंबीय, नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT