कोल्हापूर : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात पर्यटकांचा ओघ वाढला असून गुरुवारी अंबाबाईच्या दर्शनासाठी झालेली भविकांची गर्दी.  (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

Ambabai Temple | दिवाळी सुट्टीत ५ लाखांवर भाविक अंबाबाई चरणी

पर्यटनस्थळे गजबजली; दुपारपासून पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दिवाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी सहकुटुंब पर्यटनाला पसंती देणाऱ्या पर्यटकांचा ओघ कोल्हापुरात वाढला आहे. गेल्या सहा दिवसांत तब्बल ५ लाख ८०० भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. धार्मिक पर्यटनासोबतच ऐतिहासिक वास्तू, निसर्गरम्य ठिकाणे आणि कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पावले वळली. रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, वस्तुसंग्रहलय, टाऊन हॉल म्युझियम यांसह जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढल्याने शहरात पर्यटनाचा हंगाम बहरला आहे.

शाळांना २३ नोव्हेंबरपर्यंत असलेल्या सुट्ट्या आणि पर्यटनासाठी पोषक बनलेले वातावरण यामुळे कोल्हापुरात सध्या पर्यटनाचा माहौल अनुभवायला मिळत आहे. अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत भाविकांच्या रांगा लागत आहेत. अनेक पर्यटक धार्मिक दर्शनासोबतच शहरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांना भेट देण्याचे नियोजन करीत आहेत. दुपारपासून पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण पथकांची संख्या वाढविण्यात आली.

पर्यटकांच्या वाढत्या संख्येचा सकारात्मक परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवरही दिसून येत आहे. कोल्हापुरी मिसळ, तांबडा-पांढरा रस्सा, झणझणीत खाद्यपदार्थ, चप्पल, गूळ, काकवी, मसाले आणि स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंच्या खरेदीला पर्यटकांकडून पसंती मिळत आहे. हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते, दुकानदार, वाहनचालक आणि पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांच्या व्यवसायाला त्यामुळे चालना मिळत आहे.

पर्यटनाचा हंगाम अन् आर्थिक चालना

दिवाळीनंतर नोव्हेंबर अखेरपर्यंत सुट्ट्यांचा पर्यटन ओघ कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरही फेब्रुवारीपर्यंत पर्यटनासाठी अनुकूल वातावरण असल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून जाण्याची चिन्हे आहेत. धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक वारसा आणि खाद्यसंस्कृती यांचा संगम असलेल्या कोल्हापूरसाठी हा पर्यटन हंगाम आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT