कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची परंपरा कोल्हापूरकरांनी यंदाही कायम ठेवली. प्रदूषणमुक्त उत्सवाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत भाविकांनी शनिवारी (दि. १९) रात्री १० वाजेपर्यंत सुमारे ४५ हजारांहून अधिक मूर्तींचे १६० कृत्रिम कुंडांमध्ये विसर्जन केले. मध्यरात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू असल्याने हा आकडा ५५ हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, दान गणेशमूर्ती नेण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तोकडी पडली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरात ठिकठिकाणी विसर्जन कुंडाच्या जवळच मूर्ती होत्या. एकूण महापालिकेने जाहीर केलेल्या अडीच हजार कर्मचारी, वाहनांसह इतर आकडेवारीचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
अडीच हजार कर्मचाऱ्यांसह यंत्रणा
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात भाविकांनी नैसर्गिक जलस्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिकेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य केले. विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिकेने शहरात १६० कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली होती. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी अडीच हजारांहून अधिक कर्मचारी सज्ज होते. दान केलेल्या मूर्ती इराणी खणीपर्यंत वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टर आणि टेम्पोची व्यवस्था केली होती. इराणी खण येथे स्वयंचलित यंत्रणेसह १० फ्लोटिंग तराफे, ५ साधे तराफे आणि २ क्रेनच्या साहाय्याने सुरक्षित विसर्जन पार पाडले जात होते. संपूर्ण प्रक्रियेसाठी ३०१ टेम्पो, १३०० हमाल, ७ जेसीबी, ७ डंपर, ८ ट्रॅक्टर, ४ पाण्याचे टँकर, २ बूम आणि ५ रुग्णवाहिका अशी मोठी यंत्रणा अहोरात्र कार्यरत होती.
निर्माल्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती
जलप्रदूषण रोखण्यासोबतच निर्माल्याचा योग्य पुनर्वापर करण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले. २३ आरोग्य निरीक्षकांच्या देखरेखीखाली प्रत्येक कुंडाजवळ दोन शिफ्टमध्ये कर्मचारी तैनात होते, तर १४ प्रमुख विसर्जनस्थळी १५ कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. संकलित निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे. यासाठी पुईखडी, बापट कॅम्प, कसबा बावडा, दुधाळी आणि आयसोलेशन हॉस्पिटल येथे स्वतंत्र खड्डे तयार केले जाणार आहेत. ‘अवनि’, ‘एकटी’ आणि ‘वसुंधरा’ आदी संस्थांच्या सुमारे १५० महिला सदस्या या निर्माल्याचे विलगीकरण करून खतनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय योगदान देणार आहेत.
महापालिकेच्या यंत्रणेचा फज्जा
महापालिकेच्या वतीने कृत्रिम कुंडाची व्यवस्था केली असली, तरी आरतीसाठी टेबल आणि महापालिकेचे कर्मचारी नव्हते. त्यामुळे भाविकांना जमिनीवर मूर्ती ठेवून आरती म्हणावी लागत होती. तसेच गावठाणासह उपनगरांत ट्रॅक्टर वेळेवर पोहोचत नव्हते. मूर्तीची विटंबना होईल, या भीतीने भाविकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. एकूणच महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे संताप व्यक्त केला जात होता.