कोल्हापूर : शनिवार - रविवारला जोडून आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीची पर्वणी साधत गेल्या तीन दिवसांत पर्यटकांनी कोल्हापूर भटकंतीचा मनमुराद आनंद लुटला. शुक्रवारी रात्रीपासूनच कोल्हापुरात पर्यटकांचा ओघ सुरू झाला होता. सोमवारी रात्रीपर्यंत पर्यटकांच्या गर्दीने शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळे फुलून गेली. दरम्यान, तीन दिवसांत 3 लाख 25 हजार 611 पर्यटक भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्याची नोंद झाली.
नवीन वर्षात कोल्हापुरात पर्यटनाला बहर आला आहे. सलग सुट्ट्यांमुळे नोकरदार, व्यावसायिक क्षेत्रातील पर्यटक कोल्हापूरला पसंती देत आहेत. शालेय परीक्षाही आता नसल्यामुळे कौटुंबिक पर्यटन वाढले आहे. गेल्या तीन दिवसांत शनिवारी, रविवारी आणि सोमवारी कोल्हापुरातील सर्व पर्यटनस्थळे तसेच हॉटेल्स, होम स्टे, गर्दीने हाऊसफुल्ल झाली होती. सोमवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करून काही पर्यटकांनी कोल्हापूरची भमंती केली.
सोमवारी सकाळपासूनच अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती. दिवसभरात पाऊण लाख पर्यटकांनी अंबाबाईच्या दर्शनानंतर रंकाळा तलाव, न्यू पॅलेस म्युझियम, टाऊन हॉल वस्तुसंग््राहालयला भेट दिली. जोतिबा मंदिर, पन्हाळा किल्ला या परिसरातही पर्यटकांची मोठी गर्दी होती. कणेरी मठ, नृसिंहवाडी, खिद्रापूर, सातेरी यासह गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी येथील निसर्गपर्यटन व गडकोट पर्यटनालाही पसंती मिळाल्याचे दिसून आले.