Gokul Election | शून्‍य संकलन असलेल्‍या २०० संस्‍था होणार ‘पिशवी’त जमा 
कोल्हापूर

Gokul Election | शून्‍य संकलन असलेल्‍या २०० संस्‍था होणार ‘पिशवी’त जमा

अवसायनातील दूध संस्‍था सुनावणीतून आकडेवारी आली समोर

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : शून्‍य दूध संकलन असणार्‍या सुमारे २०० हून अधिक संस्‍था आता ‘पिशवी’त जमा होणार आहेत. अवसायन प्रक्रियेतील दूध संस्‍थांच्‍या सुनावणीमधून हे स्‍पष्‍ट झाल्‍याने या संस्‍था अपात्र होणार, हे नक्‍की आहे. त्‍यामुळे गोकुळ निवडणुकीत पिशवीतील दूध संस्‍थांच्‍या जोरावर एक गठ्ठा ठराव असल्‍याचे सांगत राजकारण करणार्‍यांसाठी हा मोठा दणका मानला जात आहे. शून्‍य संकलनामध्‍ये कोणत्‍या तालुक्‍यातील किती संस्‍था याचे चित्र मात्र सोमवारी स्‍पष्‍ट होईल.

अवसायान प्रक्रियेतील १,३२० दूध संस्‍थांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पात्र संस्‍थांना निकाल पत्रासोबत ठरावाचा मसुदाही पाठविण्‍यात आला आहे. तर अपात्र संस्‍थांना केवळ निकाल पत्र पाठविण्‍यात आले आहे. १,३२० पैकी २६७ संस्‍थांना तत्‍कालीन सहायक निबंधक सुजय कदम यांनी यापूर्वीच निकाल दिला आहे. त्‍यामुळे आता १,०५३ संस्‍था या प्रक्रियेत असून त्‍यांना निकाल पत्र पाठविण्‍यात आले आहे. मात्र, यापैकी किती संस्‍था पात्र आणि अपात्र ठरल्‍या याची आकडेवारी सहाययक निबंधक कृष्‍णा ठाकरे सोमवारी जाहीर करणार आहेत.

सुमारे ७०० संस्‍था अपात्र ठरण्‍याची शक्‍यता

सहायक निबंधक कार्यालयाकडून अवसायन प्रक्रियेतील पात्र संस्‍थांना ठराव पाठविले आहेत. गोकुळने सादर केलेल्‍या ५,४७० पैकी साधारणत: ४,७०० ते ४,८०० दूध संस्‍थांना ठराव मसुदा पाठविल्‍याचे समजते. त्‍यानुसार सुमारे ७०० संस्‍थांना ठराव मसुदा पाठविला नसल्‍याने या संस्‍था अपात्र ठरण्‍याची शक्‍यता आहे.

अवसायनातील २५० संस्‍था पात्र

सुजय कदम यांनी निकाल दिलेल्‍या २६७ संस्‍थांची मुंबईत सुनावणी सुरू आहे. त्‍यामुळे या संस्‍थांचा निर्णय पुढील काळात होईल. २६७ संस्‍था वगळता शिल्‍लक राहिलेल्‍या १,०५३ पैकी ९५ संस्‍था गोकुळशी संलग्‍न नाहीत. तर सुमारे ७०० संस्‍थांना ठराव मसुदा पाठविलेला नाही. यावरून अवसायन प्रक्रियेतील २५० संस्‍थांच पात्र ठरतील, असे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT