कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत यंदा 30 हजार सभासदांना वाली कोण, हा प्रश्न केंद्रस्थानी आला आहे. सभासदत्व आणि मतदान कार्ड असूनही हजारो सभासदांची नावे मतदार यादीत नसल्याने चित्रपट वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केवळ 3,403 सभासदांनाच मतदानाचा अधिकार मिळाल्याने हेच मतदार आता महामंडळाची नवी कार्यकारिणी ठरविणार आहेत.
महामंडळाची निवडणूक 7 जून रोजी होणार असून, 8 जूनला मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणुकीचे अंतिम चित्र जवळपास स्पष्ट झाले असून, समर्थ पॅनेल आणि चित्रकर्मी पॅनेल यांच्यात थेट सामना रंगणार आहे. महामंडळाचे सध्या हयात एकूण सभासद सुमारे 30 हजार असल्याची नोंद आहे. पूर्वी ही संख्या 65 हजारांपर्यंत होती. त्यातील अनेक सभासद मृत झाले, तर सुधारित यादीत सुमारे 30 हजार सभासद अस्तित्वात असल्याचे चित्र आहे. मात्र, 2018 मध्ये सभासद नोंदणी ठरावाची बैठक न झाल्याने मोठ्या संख्येने सभासदांची नावे मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत. कोल्हापूर, पुणे, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील अनेक सभासदांकडे मतदान कार्ड असूनही त्यांना मतदानाचा अधिकार मिळत नसल्याने संताप वाढला आहे.
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनीही काही दिवसांपूर्वी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या भूमिकेला अनेक कलाकार व तंत्रज्ञांनी पाठिंबा दिला. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली; मात्र मतदार यादीतील त्रुटींवरील तक्रारींची दखल का घेतली गेली नाही, असा सवाल आता चित्रपटसृष्टीतून उपस्थित केला जात आहे.
निवडणुकीत समर्थ पॅनेल व चित्रकर्मी पॅनेल या दोन प्रमुख पॅनेलमध्ये थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. 3 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित 14 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात आहेत. मावळते अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी समर्थ पॅनेल आणि माजी संचालक सतीश रणदिवे यांनी चित्रकर्मी पॅनेल घोषित केले आहेत. दोन्ही पॅनेलचे प्रत्येकी 14 उमेदवार निवडणूक लढवत असून, 16 अपक्ष उमेदवारांनीही मैदानात उडी घेतल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.
शुक्रवारी गायन समाज देवल क्लबच्या भांडारकर सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी रागिणी खडके यांच्या उपस्थितीत चिन्हांचे वाटप करण्यात आले. समर्थ पॅनेलला पतंग, तर चित्रकर्मी पॅनेलला कपबशी हे चिन्ह देण्यात आले. उर्वरित अपक्ष उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार आणि उपलब्धतेनुसार छत्री, टेलिफोन, रेडिओ, शिट्टी, रोड रोलर, फेटा, गिटार, नारळ, दुचाकी, फुलपाखरू, तबला-डग्गा आदी चिन्हांचे वाटप करण्यात आले.