गडहिंग्लज : जनता दलाने कायम समाजवाद जोपासला आहे. समाजातील गोरगरिबांसाठीच भाजप काम करत असल्याने जनता दलापेक्षाही आमचा समाजवाद उत्तम आहे. आज भाजपात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विचारांशी प्रतारणा केली आहे असे कधीच मनात आणू नये, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
गडहिंग्लज येथे जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसह रविवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, डावी विचारसरणी म्हणजे गरिबांसाठी श्रीमंताबरोबर लढणे. हेच काम भाजप करत असून जात, धर्म न मानता काम भाजप करत आहे. म्हणूनच मुस्लिम समाजही भाजपबरोबरच जोडला जात आहे. जनता दलाचे कार्यकर्ते छोट्या संघटनेतून मोठ्या संघटनेत आले असून त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल.
स्वाती कोरी म्हणाल्या, गेली अनेक वर्षे जनता दलात एक पक्ष, एक विचार म्हणून काम केले. आज माझ्यासाठी भाजपात प्रवेश करताना सर्वाधिक कठीण व ऐतिहासिक प्रसंग आहे. ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्या निधनानंतर पक्ष पोरका झाला होता. आम्ही अनेकांना मदत केली, मात्र सर्वांनीच आमचा केवळ वापर केला. मंत्री मुश्रीफांनी तर जनता दलाला संपवण्याचाच निर्धार केला होता. त्यामुळे कार्यकर्ते जगले नाहीत तर पक्षच जगू शकत नाही याची जाणीव झाल्यानेच हा निर्णय घेतला.
आ. शिवाजी पाटील यांनी, पक्ष मोठा असून भाजपमध्ये कोणताही गट मोठा नाही. त्यामुळे गटाने आलेल्या सर्वांना सामावून घेऊन पक्ष मोठा करत कुटुंब वाढवत असल्याचे स्पष्ट केले. खा. धनंजय महाडिक यांचेही भाषण झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी स्वागत केले. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी तसेच जनता दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.