कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई, जोतिबा मंदिराचे आधुनिकीकरण करताना देवस्थानच्या मूळ ढाच्याला धक्का लागणार नाही, याची दक्षता घ्या, असे आदेश नगरविकास राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी शुक्रवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात देवस्थान विकास आराखडा कामांबाबत आढावा बैठक झाली. जिल्हा वार्षिक आराखड्यातील निधी खर्चाचे नियोजन ऑक्टोबरअखेर करा, असेही त्यांनी सांगितले.
मिसाळ म्हणाल्या, देवस्थानचे सुशोभीकरण करताना परंपरागत व्यवसाय करणार्या व्यापार्यांचाही आराखड्यात विचार करा. कोणावरही अन्याय होऊ नये. जोतिबा मंदिरातील तलावाचे पाणी फिल्टर होईल, याची दक्षता घ्या. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भाविकांची कोणत्याही स्वरूपात गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे सांगितले.
बैठकीनंतर मिसाळ यांच्या उपस्थितीत महापालिका व शासकीय संस्था महाप्रीत (महात्मा फुले रिनिव्हेबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड) यांच्यात ऊर्जा बचत, घनकचरा, शून्य कार्बन, पर्यावरण संबंधित उपक्रम, मूलभूत सुविधा, नव व नवीकरणीय ऊर्जा, आवश्यकतेनुसार प्रकल्पाबाबत सामंजस्य करार झाला. दि.28 रोजी जिल्हा प्रशासनाकडून नशामुक्ती ‘रन- एक चाल-धाव... नशामुक्त कोल्हापूरसाठी’ या टॅगलाईन खाली होणार्या नशामुक्त रनच्या आदेशाचे प्रकाशन त्यांनी केले. बैठकीनंतर त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय निधी कक्षासही भेट दिली.
यावेळी मनपा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे यांनी मंदिरातील अतिक्रमणाची मोजणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. यानंतर ते अतिक्रमण हटवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.