कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीवर केंद्रीय पुरातत्त्व विभागातील तज्ज्ञ समितीच्या वतीने संवर्धन प्रक्रिया मंगळवारी रात्री पूर्ण करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेनंतर समितीने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी बुधवारी दिवसभर गाभारा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे बुधवारीही भाविकांनी अंबाबाईच्या उत्सवमूर्तीचेच दर्शन घेतले. दरम्यान, गुरुवारी (दि. 14) धार्मिक विधी झाल्यानंतर अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन पूर्ववत सुरू होणार आहे.
अंबाबाई मूर्तीची झीज झाल्याने पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांच्या उपस्थितीत संवर्धन प्रक्रिया 11 व 12 ऑगस्ट या दोन दिवशी करण्यात आली. या कालावधीत अंबाबाईचा गाभारा बंद ठेवण्यात आल्याने उत्सवमूर्ती व देवीतत्त्व कलश पेटी चौकात प्रतिष्ठापित करण्यात आले होते. तसेच, अंबाबाईच्या उत्सवमूर्तीच्या दर्शनाची सोय कासव चौकातून करण्यात आली होती. पूर्वनियोजनानुसार बुधवारी (दि. 13) अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन पूर्ववत होणार होते. मात्र, संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समितीने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी बुधवारीही गाभारा बंद ठेवण्यात आला.
दरम्यान, पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञ समितीने संवर्धन प्रक्रियेनंतर मूर्तीच्या सद्यस्थितीबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सादर केला. तसेच, मुख्य गाभार्यातील आर्द्रतेचे प्रमाण, वायुविजन यांचा मूर्तीवर होणारा परिणाम यासह काही महत्त्वाच्या सूचना देवस्थान समितीला दिल्या. त्याचप्रमाणे श्रीपूजकांचीही मूर्तीच्या देखभालीबाबत चर्चा केली. या सूचनांचे पालन करावे, असे संवर्धन समितीने स्पष्ट केले.