दिलीप भिसे
कोल्हापूर : कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक नीलोत्पल शुक्रवारी (दि. 24) पदभार स्वीकारणार आहेत. नीलोत्पल यांची गडचिरोली येथील साडेतीन वर्षांची कारकीर्द धडकी भरविणारी ठरली आहे. कर्तव्यकठोर, धडाकेबाज निर्णयक्षमतेमुळे अतिदुर्गम भागातील नक्षली नेत्यांसह साखळीला त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भाग आणि सीमावर्ती टापूत फोफावणार्या तस्करांसह संघटित गुन्हेगारी टोळ्यांना रोखण्यासाठी नीलोत्पल यांच्या बेधडक पॅटर्नची जिल्ह्याला आवश्यकता आहे.
शहर, जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरू आहे. नशिल्या पदार्थांसह गांजा, बनावट दारू, गुटखा तस्करांनी साम—ाज्य उभारले आहे. महामार्गावर तस्करी टोळ्यांची दहशत आहे. त्यांचा कब्जाच पडला आहे. 16 ते 21 वयोगटातील तरुणाई व्यसनाच्या विळख्यात गुरफटली आहे. नशिल्या गोळ्यांचा बाजार मांडला आहे. काळ्याधंद्याचे पीक जोमाने वाढले आहे. मटका, तीनपानी जुगारी अड्डे रात्रंदिवस सुरू आहेत. क्षुल्लक कारणांतूनही शहर, जिल्ह्यात मुडदे पडत आहेत. घातक शस्त्रांची तस्करी सुरू आहे. या माध्यमातून परप्रांतीय टोळ्यांची जिल्ह्यात चलती आहे. खासगी सावकारांसह खंडणीखोरांनी सामान्यांसह व्यावसायिकांचे जगणे मुश्कील केले आहे.
गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे जिल्ह्यात बिनबोभाट रॅकेट चालत आहेत. आर्थिक गुन्हेगारी वाढत चालली आहे. दामदुपटीच्या नावाखाली सामान्यांना कोट्यवधीचा गंडा घातला जात आहे. मध्यवर्ती बसस्थानक आवार, एसटी बसेसमधून प्रवास करणार्या महिलांच्या दागिन्यांवर भरदिवसा डल्ला मारला जात आहे; पण एकाही गुन्ह्याचा छडा लागलेला नाही. पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक राहिला नाही. राजकीय आश्रयाने गुन्हेगारी टोळ्या बोकाळल्या आहेत. सामान्यांचे हित आणि न्यायासाठी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
पोलिस अधीक्षकांच्या नक्षलविरोधी अभियानाचा बेधडक यशस्वी पॅटर्न
गडचिरोली जिल्ह्याला नक्षलवादाच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी नीलोत्पल यांनी राबविलेला गडचिरोली पॅटर्न यशस्वी ठरला. साडेतीन वर्षांच्या काळात अतिदुर्गम भागात 11 नवीन पोलिस ठाणी त्यांनी उभारली. ऑक्टोबर 2025 मध्ये नक्षलवाद्यांचा नेता भूपतीसह 61 सहकार्यांनी शरणागती पत्करली. त्यांच्या कारकिर्दीत 167 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.