कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) ला प्रारूप मतदारयादी सादर करण्याचा आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक दुग्ध राजकुमार पाटील यांनी दिला. तालुकानिहाय यादी सादर करण्यास 2 मार्चपर्यंत मुदत दिली आहे. याबाबतचे पत्र निवडणूक अधिकारी पाटील यांनी बुधवारी (दि. 25) ‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांना दिले. त्यानुसार प्रारूप मतदारयादी तयार करण्याच्या कामाला ‘गोकुळ’कडून सुरुवात झाली आहे.
‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची मुदत 4 मे 2026 रोजी संपत आहे. मंगळवारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवली. 2025 मधील प्रलंबित राहिलेल्या सहकारी संस्था आणि 2026 मध्ये निवडणुकीस पात्र असणार्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचा आदेश दिला. स्थगिती उठविल्याने ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. बुधवारी पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील यांनी ‘गोकुळ’च्या 2026 ते 2031 या कालावधीसाठीच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रारूप मतदारयादी सादर करण्याचे पत्र ‘गोकुळ’ला दिले. 4 मे 2026 ही अर्हता दिनांक धरून दोन प्रतीत प्रारूप मतदारयादी सादर करावी. यापैकी एक प्रत सहायक दुग्ध निबंधक कार्यालयाकडे सादर करावी आणि त्याची सॉफ्ट कॉपी विभागीय उपनिबंधक दुग्ध, पुणे यांच्या कार्यालयाकडे 2 मार्चपर्यंत सादर करण्याची सूचना पत्रात केली आहे.
‘गोकुळ’कडून तयारी सुरू
‘गोकुळ’ने पत्र मिळाल्यानंतर तत्काळ प्रारूप मतदारयादी तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. ‘गोकुळ’कडे सध्या 5 हजार 470 दूध संस्था सभासद आहेत. संचालक मंडळासोबत चर्चा करून प्रारूप मतदारयादी सहायक निबंधक कार्यालय, कोल्हापूर आणि विभागीय उपनिबंधक कार्यालय, पुणे यांच्याकडे पुढील दोन दिवसांत सादर केली जाणार आहे.
सहायक निबंधक कार्यालयात प्रक्रिया
‘गोकुळ’ने प्रारूप मतदारयादी सादर केल्यानंतर सहायक निबंधक कार्यालयातून पुढील प्रक्रिया होणार आहे. प्रारूप मतदारयादीतील संस्थांकडून ठराव मागवणे, छाननी करणे, हरकती मागवणे, हरकतींवर सुनावणी घेऊन अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करणे ही सर्व प्रक्रिया येथील सहायक निबंधक दुग्ध कार्यालयातून होणार आहे.