कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका हद्दवाढीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, आगामी निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नवीन सूत्रानुसार पंचगंगा नदीच्या आतील तसेच पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या आत असलेल्या सुमारे 8 ते 10 गावांचा समावेश करून महापालिकेची हद्दवाढ करण्याचा पर्याय काढला जाणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा मुद्दा गेली 50 वर्षे प्रलंबित आहे. नगरपालिका महानगरपालिकेत रूपांतरित झाली असली, तरी महापालिकेची हद्द एक इंचही वाढलेली नाही. प्रत्येक वेळी हद्दवाढीचा प्रस्ताव पुढे येताच संबंधित गावांमधून मोठ्या प्रमाणावर विरोध होत असल्याने शासन निर्णय घेण्यात सावधगिरी बाळगत आले आहे. परिणामी, हद्दवाढ समर्थक व विरोधक यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी सरकारने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही.
8 जानेवारी 2021 रोजी तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महापालिकेला भेट दिल्यानंतर हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. त्यांनी त्या वेळी हद्दवाढीसाठी नव्याने फेरप्रस्ताव सादर करा, असे निर्देश दिले होते. त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले, तरी त्यांच्या कार्यकाळातही या विषयावर अंतिम निर्णय झाला नाही. सर्वच प्रमुख नेते हद्दवाढीसाठी सकारात्मक भूमिका घेत असल्याचे बोलले जाते; पण निर्णय मात्र अद्याप प्रतीक्षेत आहे.
चारच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या रखडलेल्या निवडणुकांना हिरवा कंदील दिला. त्यामुळे येत्या चार महिन्यांत निवडणुका होणार, हे निश्चित झाले आहे; मात्र निवडणुकीपूर्वी सहा महिन्यांच्या आत महापालिका हद्दीत कोणताही बदल करता येत नाही, असा नियम असल्याने शासन हद्दवाढीचा निर्णय तत्काळ घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.