कोल्हापूर

सुळकुड योजना : दूधगंगा काठावरील “त्या” गावांना बारमाही पाण्याची हमी कोण देणार?

backup backup

दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा : दूधगंगा नदी काठाच्या विरोधाला डावलून इचलकरंजी महानगरपालिकेने सुळकुड योजना राबवण्याच्या प्रक्रियेची घोडदौड सुरूच ठेवली आहे. मात्र सुळकुड पासून खाली येणारे महाराष्ट्र, कर्नाटकातील कुन्नूर, बारवाड, कारदगा, बोरगाव, सदलगा, मलिकवाड, एकसंबा, घोसरवाड, नवे व जुने दानवाड, दत्तवाड, टाकळीवाडी, अब्दुललाट, शिवणकवाडी, हेरवाड या गावांना बारमाही पाणी उपलब्ध करून देण्याची हमी कोण देणार? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सुळकूड योजना पूर्ण होऊ देणार नसल्याची भूमिका नदी काठावरून व्यक्त होत आहे.

वास्तविक दूधगंगा, काळमवाडी धरणातील एकूण पाणीसाठ्यातील पाणी वाटपाची दिशाभूल करणारी आकडेवारी समोर करून ही योजना पूर्ण झाली तरी, दूधगंगा नदी काठाला पाण्याची कमतरता भासणार नाही असा "आभास" निर्माण केला जात आहे. पण कोणत्याही मोठ्या योजना दूधगंगा नदी काठावर कार्यान्वित नसतानाही नदीकाठावरील गावांना वर्षातील अनेक वेळा पाणी समस्येला सामोरे जावे लागते आणि आता तर कोल्हापूरसाठी थेट पाईपलाईन, इचलकरंजी साठी सुळकुड योजना व त्यातच भर म्हणजे गांधीनगर सह परिसरातील १३ गावांनाही दूधगंगेतून योजना राबवली जात आहे. मग दूधगंगा नदी काठाला पाणी नेमके कशातून व कोणत्या कोट्यातून उपलब्ध होणार ? हा अनुत्तरीत प्रश्न आहे.

दूधगंगा नदी काठावरील नागरिकांनी सुळकुड योजना मंजूर होऊ नये यासाठी अनेक वेळा योजने विरोधात मोर्चे काढले, प्रशासनाला निवेदने दिली, गावे बंद ठेवून निषेध व्यक्त केला, मंजुरी आदेशाच्या होळी केल्या. मात्र इतके सर्व करूनही प्रशासनाला जाग आली नाही व या विरोधाला प्रशासनाने जणू वाटाण्याच्या अक्षता दिल्या व योजनेची अंमलबजावणीची प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. दूधगंगा नदी काठावरील विरोधाबाबत दुधगंगा बचाव कृती समितीची साधी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अथवा लोकप्रतिनिधींनी भेट घेऊन चर्चा देखील केली नाही. त्यामुळे या योजनेची कार्यवाही केवळ इचलकरंजी शहराचा विचार करून राजकीय हितासाठी एकतर्फी राबवली जात आहे. यामुळे दूधगंगा नदी काठावरील महाराष्ट्र, कर्नाटकातील अनेक गावात तीव्र असंतोष प्रशासना विरोधात निर्माण झाला आहे.

सुळकुड योजना कार्यान्वित होऊ देणार नाहीच

१५६ कोटीच्या सुळकुड योजनेची निवेदा भरलेल्या मक्तेदारांना वर्क ऑर्डर निघाली तरी प्रत्यक्ष कामास दूधगंगा नदीकाठ कोणत्याही परिस्थितीत सुरू होऊ देणार नाही. त्यामुळे प्रशासनाला ही योजना रद्द करण्यास भाग पाडणारच….!
-सरपंच चंद्रकांत कांबळे, अध्यक्ष दूध गंगा बचाव कृती समिती दत्तवाड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT