चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी केवळ पाच दिवसांचा अवधी उरला असतानाच आता शेवटच्या टप्प्यात बहुतेक पक्षाच्या नेत्यांनी आपल्या पक्षाच्या निर्णायक वर्चस्वासाठी ‘ऑपरेशन महापालिका’ राबवायला सुरुवात केली आहे. यामध्ये नेत्यांनी प्रत्येक प्रभागातील उमेदवारांचे प्रचार सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या दोन टप्प्यांचा अभ्यास करून ते उमेदवार प्रभागात कितव्या स्थानावर आहेत याचा सर्व्हे केला आहे. त्याच्या आधारावर आपला उमेदवार कुठे कमी आहे? त्याच्यापुढे कोणता उमेदवार आहे? याचा अभ्यास करून डॅमेज कंट्रोलसाठी यंत्रणा कामाला लावली आहे. प्रत्येक पक्ष व त्याचे नेते आपल्या पक्षाच्या निर्णायक वर्चस्वासाठी सगळ्या तयारीने मैदानात उतरले आहेत.
कोल्हापूर महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी नेते व पक्षातील अंतर्गत चुरस शिगेला पोहोचली आहे. सुरुवातीला स्वबळाची भाषा प्रत्येक पक्षाने केली. मात्र नंतर महायुतीतील घटक पक्षांना महायुती म्हणून एकत्र यावे लागले, तर महाविकास आघाडीत दिलेल्या जागा मान्य नसल्याने शरद पवार राष्ट्रवादीने तिसर्या आघाडीच्या नावे स्वतंत्र चूल मांडली. महायुतीतही जनसुराज्य शक्ती पक्षाला भाजपच्या कोट्यातून जागा मिळणार असे वाटत असतानाच त्यांनीही स्वतंत्रपणे मैदानात उतरणे पसंत केले.
आता प्रत्येक पक्षाला व त्यांच्या नेत्यांना निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वास्तवाचे बर्यापैकी भान आले आहे. यातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी आपली खासगी यंत्रणा कार्यरत करून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यावर आपला उमेदवार कोणत्या स्थानावर आहे? त्याच्यापुढे कोणता उमेदवार आहे ? याचा सर्व्हे तयार करून घेतला आहे. त्यानुसर पुढची पावले टाकली जात आहेत.
आपला उमेदवार मागे असेल तर त्याला मतदानापर्यंत पुढे कसे नेता येईल? तो मागे का आहे? त्या प्रभागात कोणता उमेदवार पुढे आहे? त्याला मागे जाण्यास भाग पाडण्याकरिता काय उपाययोजना करता येईल? मतदारांचा कोणता समूह नाराज आहे किंवा सहकार्य करणार नाही अशी भिती आहे? महायुती व महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविताना उमेदवारांनी अंतर्गत युती-आघाडी तर केली नाही ना? याचीही चाचपणी केली जात आहे. पूर्वाश्रमीच्या मैत्रीतून अंतर्गत काही एकोपा झाला आहे का? व त्याचा फटका आपल्या पक्षाच्या उमेदवाराला बसत आहे का? अशा प्रकारची माहिती गोळा करून त्याच्या आधारेही विश्लेषण केले जात आहे.
याच्या आधारेच उमेदवार जिंकण्यासाठी यंत्रणा कामाला जुंपण्यात आली आहे. नेत्यांच्या डॅमेज कंट्रोलची ही यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विश्वासू कार्यकर्त्यांवर याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उमेदवाराकडूनही रोजच्या रोज आढावा घेतला जात आहे.
हा सगळा खटाटोप हा निर्णायक वर्चस्वासाठी सुरू आहे. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत पक्षापेक्षाही नेत्यांची व्यक्तिगत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे आपली प्रतिमा उंचावण्यासाठी व महापालिकेवर वर्चस्व ठेवण्यासाठी नेत्यांनी कसूर ठेवलेली नाही. सर्व्हे, डॅमेज कंट्रोलसाठीची उपाययोजना हा त्याचाच भाग आहे.