कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोनच दिवस उरले आहेत. यामुळे अर्ज भरण्यासाठी सोमवारी (दि. 29) आणि मंगळवारी (दि. 30) अक्षरश: झुंबड उडणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने अद्याप सर्व जागेवरील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. ज्यांना उमेदवारी जाहीर झाली, त्यांनी अर्ज भरण्याची सर्व तयारी केली. ज्यांची अजून नावे जाहीर झालेली नाहीत, त्यांची घालमेल कायम आहे. हे सर्वजण गॅसवर असले तरी अपक्ष म्हणून अर्ज भरण्याचीही तयारी अनेकांनी केली आहे. अर्ज भरताना शक्ती प्रदर्शनही होण्याची शक्यता आहे. यामुळे अखेरच्या दिवसात अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार असून, प्रशासनावर कमालीचा ताण येणार आहे.
महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास दि.23 डिसेंबरपासून सुरुवात झाली. गेल्या चार दिवसांत 20 प्रभागांतील 81 जागांसाठी इच्छुकांनी तब्बल 1,836 अर्ज नेले आहेत. त्यापैकी केवळ 28 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी सोमवार आणि मंगळवार हे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने या दोन्ही दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने सर्व उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. ज्यांची नावे जाहीर झाली, त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी सुरू केली. रविवारी दिवसभर कागदपत्रे एकत्रित करणे आणि त्यानुसार उमेदवारी अर्ज भरून तयार ठेवण्याचे काम सुरू होते. ज्यांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत; मात्र त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा आहे, त्यांची काही दिवसांपासून सुरू असलेली घालमेल कायम आहे. उद्या सर्व उमेदवारांची नावे जाहीर होतील, अशी शक्यता आहे. उमेदवारी मिळाली तर त्या पक्षातून, नसेल तर अपक्ष म्हणून ही अनेकांनी अर्ज भरण्याची तयारी केली आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीसह तिसर्या आघाडीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासह अपक्षही आहेत, यामुळे किमान 300 पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल होतील, अशी शक्यता आहे. त्यापैकी सध्या केवळ 28 उमेदवारी अर्जच दाखल झाले आहेत. यामुळे अखेरच्या दोन दिवसांत किमान 200 हून अधिक अर्ज दाखल होणार आहेत. प्रत्येक अर्जासाठी दहा-पंधरा मिनिटांचा वेळ जरी धरला, तरी सर्व कार्यालयांत दोन दिवसांत अखेरच्या क्षणापर्यंत अर्ज भरण्यासाठी गर्दी राहणार आहे. यामध्ये अर्ज चुकणार नाही, सोबत जोडणे आवश्यक असणार्या कागदपत्रांपैकी एखादे प्रमाणपत्र राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. काहींनी वकिलांकडून अर्ज भरून घेतले आहेत.
सातही कार्यालयांत विशेष बंदोबस्त
उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी अखेरच्या दोन्ही दिवशी गर्दी होणार आहे. त्यामुळे गडबड होऊन गोंधळ निर्माण होण्याचीही शक्यता आहे. यासर्व पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या सर्व सातही कार्यालय आणि परिसरात दोन दिवस विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कार्यालयाच्या परिसरात केवळ उमेदवार आणि त्यांच्यासोबत चार अशा पाचच व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे.
‘सीसीटीव्ही’ची राहणार नजर
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस म्हणजे केवळ आठ तास उरले आहेत. या कालावधीत वेळेचाही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दुपारी तीन पूर्वी उपस्थित उमेदवाराचाच अर्ज स्वीकारला जाणार आहे. यासर्व पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यालय तसेच परिसरावर ‘सीसीटीव्ही’द्वारे नजर ठेवली जाणार आहे.