Tawandi Ghat Accident | एकुलत्या मुलाच्या अपघाती मृत्यूने आई, वडिलांच्या वृद्धत्वाचा आधार हरपला ! pudhari photo
कोल्हापूर

Tawandi Ghat Accident | एकुलत्या मुलाच्या अपघाती मृत्यूने आई, वडिलांच्या वृद्धत्वाचा आधार हरपला !

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सोहेल अब्दुलरहीम मणेर (वय ३२, रा. गजानन कॉलनी, फुलेवाडी, कोल्हापूर) कुटुंब वत्सल आणि मित्रावर जिवापाड प्रेम करणारा तरुण... व्यवसाय सांभाळून मित्रांसह नातेवाईकांच्या मदतीसाठी सतत धडपड, पत्नी, तीन वर्षांच्या चिमुरडीसह वयोवृद्ध आई-वडिलांवर त्याची सारखी नजर... सुखी संसाराला जणू दृष्ट लागली. एकुलत्या मुलाचा पुणे- बंगळूर महामार्गावरील तवंदी घाटात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला अन्‌ क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं... मणेर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

निपाणीपासून काही अंतरावर असलेल्या तवंदी घाटात भरधाव ट्रकने मोटारीला धडक दिली. त्यात सोहेल मणेरसह विनोद हैबतराव पाटील (वय ३२, रा. कोरोची, ता हातकणंगले) ठार झाले, तर सहकारी नईम हसिमापीर मोमीन (३२, जवाहरनगर, कोल्हापूर), अंजुम राजेखान पिंजार (३५, किणी वाठार, हातकणंगले) जखमी झाले.

सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या दुर्घटनेत सोहेलसह विनोद जागीच गतप्राण झाल्याची बातमी समजताच दोन्हीही कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवारांना मोठा धक्का बसला. सोहेलसह त्याचे सहकारी एका औषध कंपनीत कार्यरत होते. सोहेलवर विभागीय व्यवस्थापक पदाची जबाबदारी होती. कंपनी कामासाठी सोहेलसह चार सहकारी सोमवारी सकाळी सावंतवाडीसह कुडाळला गेले होते. रात्री कोल्हापूरकडे मोटारीतून परतत असताना दुर्घटना घडली.

सोहेलच्या मृत्यूने फुलेवाडीत शोककळा

सोहेलचा मृत्यू झाल्याचे समजताच निवृत्त शिक्षक असलेल्या वडिलांसह वयोवृद्ध आई, पत्नीला शोक अनावर झाला. त्यांनी हंबरडा फोडला. मणेर यांच्या सांगरूळ (ता. करवीर), कोल्हापूर, इचलकरंजीसह सांगली, मिरजेतील नातेवाईकांनी फुलेवाडीकडे धाव घेतली. सोहेलला तीन वर्षांच्या चिमुरडीसह गर्भवती पत्नी आहे. कुटुंबातील कर्ता आणि वृद्ध आई, वडील, पत्नी, चिमुरडीचा आधार हरपल्याने परिसरात दु:खाची छाया पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT