कोल्हापूर

कोल्हापूर : रेल्वेच्या 132 वर्षांत फक्त प्लॅटफॉर्मचाच विस्तार

Arun Patil

कोल्हापूर, अनिल देशमुख : आगगाडीचे काम तडीस गेल्याने माझ्या राज्याच्या संपत्तीची साधने वाढण्याच्या कामी याचा फायदेशीर परिणाम होईल, असा आशावाद छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाच्या बांधकामाचा प्रारंभ करताना 3 मे 1888 मध्ये केला होता. यानंतर तीन वर्षांत हा मार्ग उभारला आणि 20 एप्रिल 1891 मध्ये या मार्गावर पहिली रेल्वे धावली.

गुरुवारी (दि.20) कोल्हापूरच्या रेल्वेनेे 132 वर्षे पूर्ण करून 133 व्या वर्षात पदार्पण केले आहे. लोकराजा शाहूंच्या द़ृरद़ृष्टीने कोल्हापूरच्या सर्वांगीण प्रगतीचा हा मार्ग उभारला गेला खरा, पण त्यानंतर विकासाच्या द़ृष्टीने कोल्हापूरला खमक्या कोणी मिळाला नाही, यामुळे गेल्या 132 वर्षांत कोल्हापूर रेल्वे स्थानकात केवळ प्लॅटफॉर्मचा विस्तार झाला. कोल्हापूरच्या रेल्वे विकासासाठी आजही सर्वसामान्यांना रस्त्यावरचा संघर्ष करावा लागत आहे.

पायाभरणी झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांत कोल्हापूर-मिरज मार्गाची उभारणी झाली होती. 9 मे 1971 साली मीटरगेज मार्गाचे ब—ॉडगेजमध्ये तर डिसेंबर 2020 मध्ये या मार्गाचे विद्युतीकरण झाले. गेल्या 132 वर्षांत विकास म्हणून सांगायचे म्हटले तर केवळ या दोनच गोष्टी झाल्या. त्यातही विद्युतीकरण हा राष्ट्रीय पातळीवरील निर्णयाचा भाग आहे. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षी शाहूंनी ज्या उद्देशाने, दूरद़ृष्टीने हा मार्ग उभारला. तो अधिक व्यापक करण्यात कोण्या राजकारण्याने म्हणावे तसे स्वारस्य दाखवले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

केवळ प्लॅटफॉर्म विस्तारले

कोल्हापूरच्या रेल्वेचे 132 वर्षांत केवळ प्लॅटफॉर्म विस्तारीकरण झाले. कोल्हापूर-मिरज हा मार्ग केवळ तीन महिन्यांत बांधला, त्या तुलनेत प्रगत तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ असतानाही, अवघ्या तीनशे-चारशे मीटरच्या प्लॅटफॉर्मचे बांधकाम करण्यासाठी सहा वर्षे घालवली.

सहा वर्षे पादचारी पूल हवेत

मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी या मार्गावर पादचार्‍यांसाठी पादचारी पूल मंजूर होऊन सहा वर्षे हवेतच आहे. पादचार्‍यांसाठी असणारे फाटकही बंद झाले. त्यांचा जीवघेणा प्रवास सुरूच आहे. पण, याचे कोणालाच सोयरसूतक नसल्याचे भीषण वास्तव यानिमित्ताने कोल्हापूरच्या जनतेला पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्याभरापासून अंतिम मंजुरीसाठी या पुलाची फाईल रेल्वेकडे धूळखात पडून आहे. पण, त्यासाठी पाठपुरावा करावा, हा प्रश्न तत्काळ तडीस न्यावा यासाठी राजकर्त्यांना वेळ नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.

नव्या रेल्वे गाड्या नाहीच, आहे त्या केल्या बंद

कोल्हापूर हे राज्यातील प्रमुख धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. यामुळे येथे येणार्‍या पर्यटक, भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कोल्हापुरात रेेल्वेगाड्याची संख्या वाढायला हवी होती. मात्र, येथे वेगळेच चित्र आहे. नव्या रेल्वेगाड्या तर सोडाच पण आहे, त्यापैकी पाच रेल्वेगाड्या बंद केल्या. याचा जाब विचारण्याचे आणि पुन्हा या गाड्या सुरू करण्याची हिंमत मात्र, एकाही लोकप्रतिनिधींनी आजअखेर दाखवली नाही.

'ओडिसी'ने कोल्हापूरचे महत्त्व अधोरेखीत

राज्याच्या पर्यटन विभागाने सुरू केलेल्या डेक्कन ओडिसीत कोल्हापूरच्या समावेशासाठी संघर्ष करावा लागला. यानंतर ही गाडी कोल्हापुरात येऊ लागली आणि या गाडीने कोल्हापूरचे महत्त्व अधोरेखीत केले. या गाडीने प्रवास करणार्‍या परदेशी आणि देशातील पर्यटकांनी सर्वाधिक पसंती कोल्हापूरलाच दिल्याचे अभिप्राय नोंदवहीतून स्पष्ट झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT