कोल्हापूर : कमी पाऊस, लांबलेला हंगाम याचा परिणाम साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर झाला आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात केवळ 2 लाख 6 हजार टन ऊस गाळप झाला आहे. जिल्ह्यातील अजूनही जवळपास निम्या कारखान्यांची धुराडी पेटलेली नाहीत. कारखानेही पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने गाळपावर परिणाम होत आहे. गतवर्षी 15 नोव्हेंबरपर्यंत 65 हजार एकरांवरील उसाची तोड झाली होती. आता फक्त 6 हजार एकरांवरील ऊस तुटला आहे.
शासनाने एक नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करण्यासाठी परवाना दिला आहे. शेतकर्यांनी मागील हंगामातील उसाचा दुसरा हप्ता 400 रुपये द्यावे, यासाठी आंदोलन सुरू आहे. हंगाम सुरू झाल्यानंतर दीपावलीचा सण आला, त्यामुळे ऊस तोडणी व वाहतूक कामगार येण्यास उशीर झाला. त्यातच खरीप हंगामात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे उसाची अपेक्षित वाढ झाली नाही. बारा ते चौदा महिन्यांचे ऊस पीक झाले आहे. एवढ्या कालावधीत उसाची वीस ते बावीस पेरांवर उंची जाणे अपेक्षित होते; पण सध्या 17 ते 20 पेरांवरच उसाची उंची थांबली आहे. यामुळे उत्पादनात घटत होत आहे. दुसर्या बाजूला आंदोलनामुळे ऊस तोड थांबली आहे. त्याचा परिणाम कारखान्यांच्या गाळपावर झाला आहे.
जिल्ह्यात एकूण 22 साखर कारखाने आहेत. सर्वच कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. ऊस तोडणी कार्यक्रमानुसार सुरुवातही केली आहे. त्यामुळे काही कारखान्यांच्या परिसरामध्ये उसाची वाहने देखील उभी आहेत. परंतु, हा ऊस पुरेसा नसल्यामुळे अद्याप 14 साखर कारखाने बंदच आहेत. जिल्ह्यातील केवळ आठच कारखाने सुरू असून त्यामध्ये देखील पूर्ण क्षमतेने उसाचे गाळप होताना दिसत नाही.
गतवर्षी जिल्ह्यातील बहुतांशी कारखाने ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाले होते. त्यामुळे सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होते. गेल्यावर्षी 5 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील 21 साखर कारखान्यांमधून 43 लाख 27 हजार 805 लाख टन उसाचे गाळप झाले होते. यावर्षी मात्र त्याच्या दहा टक्के देखील उसाचे गाळप होऊ शकलेले नाही. आतापर्यंत आठ कारखान्यांमध्ये केवळ 2 लाख 6 हजार टन उसाचे गाळप झालेले आहेत. गेल्यावर्षी 15 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील 21 कारखाने सुरू होते. त्यावेळी 20 ते 22 लाख टनांपर्यंत ऊस गाळप झाले होते. त्या प्रमाणात सध्या 10 टक्केही उसाचे गाळप झालेले नाही.
कर्नाटकात उसाची पळवापळवी
कर्नाटकच्या हद्दीतील सीमाभागातील काही कारखाने सुरू झाले आहेत. त्या कारखान्यांनी कागल तालुक्यातील काही भागातील उसाची उचल सुरू केली आहे. दररोज 10 हजार टन उसाची तोडणी करून हे सीमाभागातील कारखाने नेत आहेत. त्याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना बसणार आहे.