कोल्हापूर : तुमच्या आधार कार्डाद्वारे बनावट बँक खाते उघडण्यात आले आहे. त्या खात्यावर मनी लाँडरिंगच्या माध्यमातून तब्बल 6 कोटी जमा झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला अटक करून सोशल मीडियावर त्याची बातमी प्रसारित करू, अशी भीती घालून एका सेवानिवृत्त प्राध्यापिकेची 3 कोटी 57 लाख 23 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. व्हॉटस्अॅपवर कॉल करून तीन सायबर भामट्यांनी हा गंडा घातला.
याप्रकरणी मीना मुरलीधर डोंगरे (वय 75, रा. सम्राटनगर, सरनाईक माळ, कोल्हापूर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 18 एप्रिल रोजी दुपारी 1.30 ते 27 मे 2025 दुपारी 12 वा. या कालावधीत ही घटना घडली. डोंगरे पती-पत्नी सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. मुरलीधर डोंगरे हे सन 2005 मध्ये, तर मीना डोंगरे सन 2013 मध्ये शिवाजी विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले आहेत. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण अधिक तपास करत आहेत.
18 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास डोंगरे यांच्या 7391970817 या मोबाईल नंबरवर 9898805427 या मोबाईल नंबरवरून अनोळखी सायबर भामट्याने फोन केला. त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईल नंबरचे व्हॉटस्अॅप कॉल करून डोंगरे यांना, तुमचा फोन दोन तासांमध्ये बंद होणार आहे, असे सांगितले. डोंगरे यांनी त्याबाबत विचारले असता, भामट्याने आम्ही ‘ट्राय’ डिपार्टमेंटमधून बोलत आहे, कुलाबा पोलिस ठाणे माहिम येथे तुमच्या (डोंगरे) नावे 2 जानेवारी 2025 रोजी तक्रार नोंद आहे. त्याचा नंबर एमएच 56210225 असा असून, नरेश गोयल मनी लाँडरिंग अँड इन्व्हेस्टमेंट फ्रॉड केसमध्ये तुमच्या (डोंगरे) आधार कार्डद्वारे कॅनरा बँक शाखा माहिममध्ये 6 कोटी जमा झाले असल्याचे खोटे सांगितले.
त्यानंतर डोंगरे यांना वेळोवेळी व्हॉटस्अॅप कॉल करून त्यांच्या बँक खात्यांची माहिती घेतली. त्यानंतर भामट्यांनी बँक खाते क्रमांक सांगून त्यावर रक्कम जमा करण्यास सांगितले. डोंगरे यांनी भामट्यांना रक्कम जमा करण्यास नकार देताच त्यांनी, आम्ही तुमच्या घरी पोलिस घेऊन येऊ. तुम्हाला अटक करून सोशल मीडियावर बातमी प्रसारित करू, अशी धमकी दिली. त्यानंतर डोंगरे यांनी सायबर भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर आर.टी.जी.एस. व एन.ई.एफ.टी.द्वारे 3 कोटी 57 लाख 23 हजार इतकी रक्कम पाठविली. त्यानंतरही भामट्यांचे व्हॉटस्अॅप कॉल डोंगरे यांना येत होते. त्यानंतर त्यांनी मुलगी व जावई यांना घडलेली घटना सांगितली. अशाप्रकारे सायबर भामट्यांनी डोंगरे यांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
डोंगरे यांच्या मोबाईलवर 74183890850 या मोबाईल नंबरवरून व्हॉटस्अॅप व्हिडीओ कॉल आला. त्यावेळी तीन लोक सोबत बसले होते. त्यांच्या पाठीमागे मुंबई पोलिस असे लिहिलेले होते. त्यामुळे डोंगरे यांना ते खरे पोलिस असल्याचे वाटले. त्यानंतर सायबर भामट्यांनी डोंगरे यांना हे बेकायदेशीर असल्याचे सांगून त्याबाबत सुप्रीम कोर्टात केस लढावी लागेल, असे सांगितले. तसेच, त्यासाठी डोंगरे यांना पत्र लिहिण्यास सांगितले. त्याआधारे त्यांनी डोंगरे यांना कोर्टाचा सेटअप करून खटला सुरू असल्याचे भासविले. त्यानंतर भामट्यांनी डोंगरे यांना आरबीआय बँकेमध्ये तुमच्या सर्व बँक खात्यांची माहिती दिसत असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुमचे सर्व अकाऊंट डिटेल्स आमच्याकडे जमा करावे लागतील, असे डोंगरे यांना सांगितले. त्यामुळे डोंगरे यांनी सर्व बँक खात्यांची माहिती दिली अन् ते फसले.
21 एप्रिल - 42 लाख
23 एप्रिल - 15 लाख
13 मे - 10 लाख
22 एप्रिल - 32 लाख 23 हजार
7 मे - 10 लाख
9 मे - 33 लाख
23 मे - 14 लाख
13 मे - 20 लाख
15 मे - 60 लाख
19 मे - 8 लाख
9 मे - 54 लाख
13 मे - 25 लाख
16 मे - 27 लाख
16 मे - 7 लाख
एकूण - 3 कोटी 57 लाख 23 हजार रुपये.