आशिष शिंदे
कोल्हापूर : ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनांचे लोण आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील मानसोपचार विभागात येत असलेल्या रुग्णांमुळे ही बाब स्पष्ट होत आहे. याला आळा न घातल्यास गाझियाबादमध्ये तीन मुलींनी केलेल्या सामूहिक आत्महत्यांसारख्या घटना घडण्याचा गंभीर इशारा मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ इंडियन सायकॉलॉजीच्या अहवालानुसार, शहरी किशोरवयीन मुलांसह आता ग्रामीण भागातील मुलांमध्येही गेमिंग डिसऑर्डरची तीव्रता व प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे.
दिवसागणिक तरुणाईचा ऑनलाईन गेममधील आभासी विश्वात वावर वाढत असल्याने इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरचा विळखा घट्ट होत चालला आहे. याहून धक्कादायब बाब म्हणजे शहरासह हे व्यसन आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ इंडियन सायकॉलॉजीच्या संशोधकांनी केलेल्या तपासणीत ग्रामीण मुलांचा व्यसनाचा तीव्रता निर्देशांक (स्कोअर) 19.15 इतका आढळला, जो शहरी मुलांच्या (16.80) तुलनेत खूपच जास्त आहे. ग्रामीण भागात गेमिंग डिसऑर्डर वाढण्याची दोन प्रमुख कारणे आहेत: जागरूकतेचा अभाव आणि मनोरंजनाचे मर्यादित पर्याय. शहरात मुले क्लासेस, मॉल्स किंवा इतर अॅक्टिव्हिटीमध्ये रमतात. मात्र, ग्रामीण भागात स्वस्त डेटा आणि स्मार्टफोन हेच मनोरंजनाचे एकमेव साधन बनले आहे. पालकांना गेमिंग हे व्यसन असू शकते याची कल्पना नसल्याने, सुरुवातीला मुलांच्या या सवयीकडे दुर्लक्ष केले जाते, जे नंतर महागात पडते.
इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर (आयजीडी) ही जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनने मान्य केलेली एक गंभीर मानसिक स्थिती आहे. यामध्ये एखादी व्यक्ती इंटरनेटवरील गेम्स खेळण्यामध्ये इतके गुंतून जाते की, त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर, अभ्यासावर आणि सामाजिक संबंधांवर त्याचे अत्यंत वाईट परिणाम होऊ लागतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, जेव्हा गेमिंगची सवय नियंत्रणाबाहेर जाते आणि त्यामुळे नैराश्य, चिंता, एकटेपणा किंवा अभ्यासात अपयश येऊ लागते, तेव्हा त्याला गेमिंग डिसऑर्डर म्हटले जाते.
तासंतास इंटरनेटवर गेम खेळण्यात व्यस्त, अभ्यासाकडे दुर्लक्ष, सामाजिक एकटेपणा, मुलांमध्ये चिडचिड, चिंता आणि नैराश्य, हिंसकपणा, झोपेचे चक्र बिघडणे, दिवसभर थकवा जाणवणे, एकाग्रता न लागणे.