कोल्हापूर, दिलीप भिसे : दामदुप्पट परताव्याचा बहाणा अन् नानाविध कंपन्यांच्या भूलभुलैयाने शहर, जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिकांसह सर्वसामान्यांचा खिसा रिकामा झालेला असतानाही अमेरिकास्थित एका ऑनलाईन कंपनीने मोबाईल अॅपच्या माध्यमातून स्थानिक एजंटांना हाताशी धरून नव्याने गुंतवणुकीचा फंडा चालविला आहे. अवघ्या 20 दिवसांत दामदुप्पट परताव्याच्या आशेने 90 दिवसांत 15 हजारांवर गुंतवणूकदारांनी कोट्यवधींच्या रकमा गुंतविल्या आहेत.
शाहूपुरी येथील बहुचर्चित ए. एस. ट्रेडर्ससह संलग्न कंपन्यांच्या कारभार्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह अन्य राज्यांतील दीड लाखांवर गुंतवणूकदारांना हजारो कोटींचा गंडा घालून कोल्हापुरातून पलायन केले. मुख्य म्होरक्यांसह सहा ते सात संचालकांनी दुबईत आश्रय घेतल्याची चर्चा आहे. ग्रोब्ज ट्रेडिंग सर्व्हिसेस, शुभट्रेड, पिनॉमिक, निवारा ट्रस्टसारख्या दोन डझनांहून अधिक कंपन्यांनी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अक्षरश: बाजार मांडून हजारो कोटींची लूट केली आहे. कमीत कमी काळात जादा परताव्याच्या आशेने उद्योजक, व्यावसायिक, बड्या भांडवलदारांसह सर्वसामान्य घटकांनीही मौल्यवान साहित्य, दागदागिने सावकारांकडे गहाण टाकून 50 हजारांपासून 50 लाखांपर्यंतच्या रकमांचा अनेक कंपन्यांत भरणा केला आहे; पण आता परतावा राहू दे, किमान गुंतवलेल्या रकमा परत मिळण्यासाठी गुंतवणूकदारांना न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे.
स्थानिक एजंट सक्रिय
विविध कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात किमान साडेपाच हजार ते सहा हजार कोटींवर फसवणूक झाल्याची शक्यता असतानाही अमेरिकेतील एका कंपनीच्या प्रतिनिधींनी बक्कळ कमिशनला सोकावलेल्या स्थानिक एजंटांना हाताशी धरून सुमारे 15 हजार जणांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले आहे. ऑनलाईन अॅपद्वारे गुंतवणूक केलेल्या रकमेवर 20 दिवसांत दुप्पट परताव्याचे आमिष दाखविले आहे. शिवाय, स्थानिक एजंटही सक्रिय झाल्याने 10 हजारांपासून लाखापर्यंतच्या रकमा गुंतविल्या जात आहेत.
हातात केवळ एक, दोन हजारच!
20 फेब्रुवारी 2023 पासून मेपर्यंत कंपनीने शहर, जिल्ह्यातून चांगलाच धंदा केला आहे. प्रथमत: गुंतवणूक केलेल्या काही गुंतवणूकदारांच्या खात्यांवर पैसे जमा झाल्याचे दिसून येते. मात्र, दामदुप्पट जमा झालेली रक्कम एकाचवेळी काढता येत नाही. केवळ हजार, दोन हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची मर्यादा असल्याने गुंतवणूकदारांत चलबिचल सुरू झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही दिवसांनंतर कंपनीच्या आर्थिक उलाढालीची नेमकी सत्यता स्पष्ट होईल, असेही सांगण्यात येत आहे.