मृत महेंद्र कुंभार  Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur News : एकतर्फी प्रेमातून मित्रानेच काढला मित्राचा काटा

दोघेही अल्पवयीन; खूनप्रकरणी संशयितास अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर/पोर्ले तर्फ ठाणे : ते दोघेही बालपणापासूनचे जिवलग मित्र... काही प्रमाणात त्यांच्या आवडीनिवडीही सारख्याच... दोन्ही कुटुंबांत त्यांच्या मैत्रीची चर्चा व्हायची. विशेष म्हणजे, नकळत्या वयात दोघांचेही एकाच मुलीवर प्रेम. मात्र, एकाबरोबरच संबंधित मुलगी बोलत होती. दुसर्‍याला त्याचा राग येऊ लागला. त्यातूनच एकतर्फी प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी त्याने तब्बल 100 फूट खोल खणीत ढकलून मित्राचा खून केला. अक्षरशः, एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी कथा केर्ले (ता. करवीर) येथे घडली. महेंद्र प्रशांत कुंभार (वय 17 वर्षे 7 महिने) असे मृत तरुणाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्या अल्पवयीन मित्राला अटक केली आहे.

महेंद्र कुंभार याचा 3 जून रोजी रात्री 9 च्या सुमारास केर्लेपैकी हनुमाननगर (ता. करवीर) येथे दगडाच्या खणीत पडून मृत्यू झाला. करवीर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू, अशी नोंद झाली. घटनास्थळी पंचनामा झाला. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, उपनिरीक्षक शंकर कळकुटे यांना कुंभार याचा घातपात झाल्याचा संशय आला. त्यानुसार त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळी कुंभार याचा मोबाईल फुटलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी मोबाईलमधील कॉल डिटेल्स काढले. शेवटचा कॉल महेंद्र याच्या जिवलग मित्राचा झाला होता. 4 जून रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला मारेकरी मित्र पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी खाक्या दाखवताच पोपटासारखा तो बोलू लागला. महेंद्र याच्या खुनाची त्याने कबुली दिली.

महेंद्र आणि खुनी अल्पवयीन असून, बारावीपर्यंत एकाच वर्गात शिकले. गावातीलच एका मुलीवर दोघांचे प्रेम बसले. मात्र, संबंधित मुलगी महेंद्रसोबत जास्त बोलत होती. त्याचा खुनी मुलाला राग येत होता. काही महिन्यांपूर्वी संबंधित मुलाने महेंद्रला तू त्या मुलीशी जास्त बोलू नकोस, असे सांगितले. मात्र, त्याचे प्रेम होते. तर, खुनी मुलगा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्यातून दोन मित्रांत वादावादी होऊन हाणामारीही झाली. परिणामी, दोघेही काही महिन्यांपासून एकमेकांसोबत बोलत नव्हते. मात्र, त्या मुलाच्या मनात महेंद्रबद्दल प्रचंड राग होता.

3 जून रोजी रात्री 8.30 च्या सुमारास महेंद्रला त्या अल्पवयीन मुलाने फोन करून हनुमाननगर येथील मोहितेंच्या दगडी खणीजवळ बोलावून घेतले. दोघांत पुन्हा वाद झाला. महेंद्र याने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो ऐकत नव्हता. सुमारे अर्धा तास वादावादी सुरू होती. हमरीतुमरी झाली. अखेर त्याने महेंद्रला सुमारे 100 फूट खोल दगडी खणीत ढकलले. त्यानंतर त्याचा मोबाईल फोडून खणीत टाकला आणि दुचाकीची चावी फेकून दिली. घटनेनंतर संबंधित मुलगा पसार झाला, असे करवीर पोलिसांनी सांगितले.

महेंद्रच्या कुटुंबीयांनी रात्री उशिरापर्यंत मुलगा न आल्याने मोबाईलवर फोन केला. परंतु, त्याचा फोन लागत नव्हता. नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. अखेर दगडाच्या खणीत महेंद्र बेशुद्धावस्थेत सापडला. नातेवाईकांनी त्याला तत्काळ उपचारांसाठी सीपीआरमध्ये दाखल केले. परंतु, येथे त्याचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT