Blood Sugar Health | राज्यात प्रत्येक सहा प्रौढांमागे एकाला शुगर 
कोल्हापूर

Blood Sugar Health | राज्यात प्रत्येक सहा प्रौढांमागे एकाला शुगर

तीन वर्षांत महिलांमध्ये रक्तातील साखर १२.४ वरून १६ टक्क्यांवर; पुरुषांमध्ये १३.६ वरून १७.७ टक्के

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : नाही मी गोड खात नाही, मला शुगरचा त्रास आहे. राज्यात प्रत्येक सहा प्रौढांमागे एक जण आपल्याला हेच सांगताना दिसतो. धक्कादायक बाब गेल्या तीन वर्षांत रक्तातील साखर जास्त असलेल्या महिलांचे प्रमाण १२.४ टक्क्यांवरून १६ टक्क्यांपर्यंत, तर पुरुषांचे प्रमाण १३.६ टक्क्यांवरून १७.७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण ३१.१ टक्के, तर पुरुषांत हे प्रमाण ३२.८ टक्क्यांवर पोहोचले आहे. हेच मधुमेहाचे प्रमुख कारण ठरत आहे. यामुळे हृदयविकार, मूत्रपिंड विकार, पक्षाघात आणि इतर असंसर्गजन्य आजारांचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत जात आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालातून ही चिंताजनक बाब समोर आली आहे. अहवालानुसार, महिलांपैकी ७.८ टक्के आणि पुरुषांपैकी ८.८ टक्के जणांची रक्तातील साखर १६० मिलिग्रॅम प्रति डेसिलिटरपेक्षाही जास्त आढळून आली आहे. ही पातळी मधुमेहाच्या गंभीर धोक्याकडे निर्देश करणारी मानली जाते.

यामुळे महिलांना होतोय मधुमेह

महिलांमध्ये वाढता लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव, प्रसूतीनंतर वाढणारे वजन, हार्मोनल बदल, वाढते शहरीकरण, प्रक्रिया केलेले व साखरयुक्त अन्‍नपदार्थांचे सेवन, मानसिक ताणतणाव आणि अनियमित जीवनशैली यामुळे मधुमेहाचा धोका वाढत आहे. विशेषतः घर आणि नोकरीची दुहेरी जबाबदारी, व्यायामासाठी कमी वेळ आणि रजोनिवृत्तीनंतर होणारे शारीरिक बदल यांचाही महिलांमधील मधुमेहवाढीत मोठा वाटा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

‘ही’ कारणेही मधुमेहास जबाबदार

अपुरी झोप आणि रात्री उशिरापर्यंत जागरण

सततचा मानसिक ताण आणि चिंता

पोटाभोवती साचलेली चरबी (बेली फॅट)

दिवसभर बसून काम करण्याची सवय

शारीरिक हालचालींचा अभाव

प्रक्रिया केलेले आणि पॅकेज्ड अन्नपदार्थ

सॉफ्ट ड्रिंक्स व साखरयुक्त पेयांचे सेवन

हवेतील वाढते प्रदूषण

व्हिटॅमिन डीची कमतरता

धूम्रपान व तंबाखूचे सेवन

गर्भावस्थेतील मधुमेहाचा इतिहास

कमी पाणी पिणे व निर्जलीकरण विशेषतः ३० ते ३५ वर्षांनंतर प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा फास्टिंग ब्लड शुगर, पीपी शुगर आणि एचबीए१सी तपासणी करणे आवश्यक आहे. वारंवार तहान लागणे, लघवीचे प्रमाण वाढणे, अचानक वजन कमी होणे, सतत थकवा जाणवणे, दृष्टी धूसर होणे किंवा जखमा उशिरा भरणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
डॉ. जहीर पटवेकर, डायबेटोलॉजिस्ट, सीपीआर, कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT