कोल्हापूर : रक्तदानाबाबत अनेक प्रकारचे गैरसमज गेल्या काही वर्षांत विविध माध्यमांतून झालेल्या जनजागृतीमुळे मागे पडले आहेत. रक्तदान करून दुसऱ्याला जीवदान देण्यासाठी असंख्य रक्तदाते पुढे येत आहेत. रक्त विघटनानंतर रक्ताची एक बाटली चौघांना जीवदान देते. डेंग्यूसह अन्य कारणांनी रुग्णांच्या प्लेटलेट कमी होतात. अपघात, शस्त्रक्रिया, थॅलेसेमियासह अन्य आजारांच्या रुग्णांना नियमित रक्ताची मागणी वाढली आहे. आलीकडे रक्तगटांची टंचाई वारंवार निर्माण होत आहे. त्यामुळे रक्तदान मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे.
रक्तदान कोणी करावे?
१८ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तीने रक्तदान करावे. रक्तदात्याचे वजन ५० किलोपेक्षा अधिक असावे, पुरुष रक्तदात्याचे हिमोग्लोबीन १२.५ टक्के असावे आणि महिलांमध्ये ११.५ टक्के असावे.
कोणी रक्तदान टाळावे?
एड्स, क्षयरोग, कावीळ, मलेरिया, कॅन्सरग्रस्तांसह जुने आजार असणाऱ्या व्यक्तींनी रक्तदान करू नये. मोठी शस्त्रक्रिया झालेल्या लोकांनीदेखील रक्तदान करू नये. व्यसनी लोकांनी रक्तदान टाळावे.
या गटाच्या रक्तदात्यांनी सहकार्य करावे
ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, एबी निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह या रक्तगट असणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. त्यामुळे या रक्तगटांची टंचाई भासते. या गटाचे दाते रक्तदानासाठी सहसा पुढे येत नाहीत. या लोकांनी रक्तदानासाठी पुढे यावे. अशा गटाच्या रक्तदात्यांमुळे एखाद्याचा जीव वाचणार आहे.
रक्तदानाचे फायदे
कॅन्सर, हृदयरोग, रक्तदाब यावर नियंत्रण राहते. रक्ताची गरज भासते तेव्हा आर्थिक बचत होते. रक्तदानामुळे शरीरात नवीन रक्त तयार झाल्याने शरीर निरोगी राहते. रक्तदात्यांना कार्ड मिळते. त्यामुळे त्यांना गरजेवेळी मोफत रक्त मिळते.
काय आहे ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’?
जगात पहिला अत्यंत दुर्मीळ असा ‘बॉम्बे ब्लड ग्रुप' हा रक्तगट मालवण येथील रेवताळे (जि. सिंधुदुर्ग) येथे आढळला. पंकज गावडे असे या रक्तदात्याचे नाव आहे. दहा लाख लोकसंख्येमध्ये केवळ चार व्यक्तींमध्ये हा रक्तगट आढळून येतो. या दुर्मीळ रक्तगटाचा शोध सर्वप्रथम मुंबईमधील केईएम रुग्णालयात १९६२ मध्ये डॉ. वाय. एम. भेंडे यांनी लावला. मुंबईत शोध लागल्याने ‘बॉम्बे ब्लड ग्रुप' असे त्याचे नामकरण करण्यात आले. ‘अँटिजन एच' या घटकामुळे हा रक्तगट इतर गटांपेक्षा वेगळा आहे. या रक्तगट असलेल्या व्यक्तीचे रक्त इतरांना चालते; पण इतर व्यक्तींचे रक्त बॉम्बे ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तीला चालत नाही.