Ambabai temple news | सव्वादोन लाख भाविक अंबाबाईचरणी लीन Pudhari File Photo
कोल्हापूर

Ambabai temple news | सव्वादोन लाख भाविक अंबाबाईचरणी लीन

चार दिवसांतील गर्दीचा उच्चांक; महाद्वारसमोर दर्शन रांगेची स्वतंत्र व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रौत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून रोज लाखाच्या घरात भाविक दर्शनासाठी येत आहेत. गुरुवारी गेल्या चार दिवसांतील गर्दीचा उच्चांक गाठत सव्वादोन लाख भाविक अंबाबाईचरणी लीन झाले.

नवरात्रौत्सवानिमित्ताने अंबाबाई मंदिर गर्दीने फुलून गेले आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासूनच अंबाबाई मंदिराच्या मुख्य दर्शनरांगेसह मुखदर्शनाची रांग गजबजली. मंदिराच्या पूर्व दरवाजातून मुख्य दर्शनरांगेतून पितळी उंबर्‍याबाहेरून दर्शन घेण्याची सोय केली आहे. मुखदर्शनासाठी गणपती चौक व गरुड मंडपाबाहेर महाद्वारासमोर स्वतंत्र दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. घाटी दरवाजा, विद्यापीठ गेट आणि महाद्वार येथून मुखदर्शनासाठी भाविक मंदिरात येत असल्याने एका जागी गर्दी रेंगाळू नये, यासाठी नियंत्रण कक्षातून सूचना दिल्या जात आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

देवस्थान समितीच्या वतीने कारंजा चौकातील मंडपात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवारी दिवसभरात भारुड, भक्तिगीत, भावगीत, शास्त्रीय नृत्य असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमांचा आस्वाद हजारो भाविक घेत आहेत. कलाकारांना देवस्थानतर्फे अंबाबाईचा प्रसाद देऊन सन्मानित करण्यात येते.

स्तनदा मातांसाठी दोन हिरकणी कक्ष

अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार्‍या स्तनदा माता भाविकांसाठी युनिकर्म इंडिया कंपनीच्या सामाजिक फंडातून दोन हिरकणी कक्ष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते या कक्षाचे गुरुवारी उद्घाटन झाले. जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर शेतकरी बझारमध्ये सुरू झालेल्या या हिरकणी कक्षात एका वेळी चार महिलांना स्तनपान करता येईल, अशी व्यवस्था केली आहे.

मोबाईल वापरावरून भाविक व पोलिसांमध्ये हुज्जत

अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक मंदिर परिसरात फोटो काढतात. शनी मंदिरासमोर फोटो काढणार्‍या काही भाविकांना पोलिसांनी हटकले असता त्यांच्यात वाद झाला. मंदिराच्या आतील भागातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्यावर बंदी घातली जात नाही आणि आठवण म्हणून मंदिराबाहेरील आवारात फोटो काढणार्‍यांना विरोध का करता, असे म्हणत पर्यटक भाविकाने पोलिसांशी वाद घातला. अखेर देवस्थानने यामध्ये मध्यस्थी केल्यानंतर वाद निवळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT