कोल्हापूर: पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज (दि.१ जानेवारी) पहाटेच्या सुमारास एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. तावडे हॉटेल परिसरात भरधाव वेगाने आलेल्या एका इनोवा कारने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या तिघांना भीषण धडक दिली. या भीषण अपघातात तिन्ही व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला असून, कोल्हापूर शहरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दिलीप अण्णाप्पा पवार( वय ६५, वळीवडे रोड, गांधीनगर), सुधीर कमालाकर कांबळे (४१ रा. आटपाडी, जि. सांगली) आणि विनयसिंग गौड (वय २७ रा. मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.
शेकोटी ठरली शेवटची...
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज गुरूवारी (दि.१ जानेवारी) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. थंडीचा कडाका असल्याने तावडे हॉटेल चौकात रस्त्याच्या कडेला काही लोक शेकोटी पेटवून उब घेत उभे होते. याच दरम्यान, महामार्गावरून अतिवेगात येणाऱ्या एका इनोवा कारने या तिघांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तिघांचाही जागीच अंत झाला.
पोलीस प्रशासनाकडून तातडीची कारवाई
घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तिन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी (Post-Mortem) सीपीआर रुग्णालयात पाठवले आहेत. मृतांची ओळख अद्याप पटली नसून सध्या पोलीस मृतांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. संबंधित कार चालकावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.