मतदार यादी Pudhari
कोल्हापूर

Gram Panchayat Election | ग्रा.पं.साठी जुनीच मतदार यादी

२४ जुलैला प्रारूप; ४ ऑगस्टला प्रभागनिहाय अंतिम यादी प्रसिद्ध

पुढारी वृत्तसेवा

अनिल देशमुख

कोल्हापूर : जिल्ह्यातील २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ४५८ ग्रामपंचायतीसह राज्यातील तब्बल १५ हजार ६३६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक एसआयआर प्रक्रियेमुळे लांबणीवर पडण्याची चिन्हे असतानाच आता राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी १५ एप्रिल २०२६ रोजीची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी ग्राह्य धरण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

यामुळे एकीकडे मतदारांची सखोल पडताळणी करून नव्याने मतदार यादी तयार केली जात असताना राज्यातील या ग्रामपंचायतींच्या निवडणुका मात्र जुन्याच मतदार यादीनुसार होणार आहेत. राज्यात सध्या मतदार यादी पडताळणीसाठी एसआयआर (विशेष सखोल पुनरीक्षण) प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेद्वारे मयत, स्थलांतरित, दुबार मतदार वगळले जाणार आहेत. यासह गणना अर्ज भरून न देणारे, आवश्यक पुरावे सादर न करणाऱ्यांचीही नावे मतदार यादीतून रद्द होण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रक्रियेद्वारे ऑक्टोबर २०२६ मध्ये राज्याची नवी मतदार यादी तयार होणार आहे. या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हीच नवी मतदार यादी ग्राह्य धरली जाईल, अशी शक्यता होती. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकाही लांबणीवर जातील, असे वाटत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादींचा कार्यक्रम जाहीर केला.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १५ हजार ६३६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांसाठी प्रभाग रचना झाली. यानंतर प्रभाग आरक्षणाचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता १५ एप्रिल २०२६ ची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी ग्राह्य धरून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मतदार यादी ग्राह्य धरणार : १५ एप्रिल २०२६

प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : २४ जुलै

हरकती व सूचना स्वीकारणार : २४ ते २९ जुलै

मतदार यादी अंतिम करणार : ४ ऑगस्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT