इचलकरंजी : महिलेच्या घरात घुसून तिच्याशी लगट करून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यासह व्हॉटस्अॅपवर अश्लील संभाषणाची ऑडिओ क्लिप पाठवून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी परशुराम बाळू चव्हाण (वय 35) व अजय शामराव वडिंगे (35, दोघे रा. मंगळवार पेठ, इचलकरंजी) या दोघांना अटक केली. याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे.
पीडित महिलेच्या व्हॉटस्अॅपवर परशुराम चव्हाण याने मेसेज पाठवत शरीरसुखाची मागणी केली. 30 एप्रिल रोजी रात्री त्याने पुन्हा पीडित महिलेच्या घरात घुसून विनयभंग केला. वडिंगे याच्यासोबत झालेले अश्लील संभाषण रेकॉर्डिंग करून ती ऑडिओ क्लिप पुन्हा 3 मे रोजी पीडित महिलेच्या व्हॉटस्अॅपवर पाठवली. दोघांनाही न्यायालयाने 7 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे पो. नि. चव्हाण यांनी सांगितले.