सतीश सरीकर
कोल्हापूर : जिल्ह्यातील नागरिकांचा जगभर पोहोचण्याचा प्रवास पासपोर्टच्या माध्यमातून अधिक दृढ होत आहे. दीड वर्षात तब्बल 50 हजार 380 नागरिकांनी पासपोर्ट काढले. ही केवळ संख्या नसून बदलत्या सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवाहाचे सूचक आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, पर्यटन किंवा स्थायिक होण्याच्या दिशेने होणार्या या हालचाली सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाचे दर्शन घडवतात.
कोल्हापुरातील तरुणांमध्ये परदेशात शिक्षण आणि नोकरीची उत्सुकता वाढली आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूके, जर्मनी, यूएई, कतार आणि नेदरलँडस् या देशांमध्ये युवक-युवती जात आहेत. शिक्षणानंतर तिथेच नोकरीच्या संधी आणि स्थायिक होण्याचा प्रयत्न हा ट्रेंड दिसतो. शिक्षण, नोकरी, पर्यटन आणि स्थायिकतेसाठी परदेशात जाणार्यांची वाढती संख्या ही एक महत्त्वाची घडामोड ठरत आहे.
पर्यटनासाठीही पासपोर्ट मिळवणार्यांची संख्या मोठी आहे. सिंगापूर, थायलंड, दुबई, मलेशिया, युरोप देशांमध्ये टूर पॅकेज घेऊन जाणार्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांनी परदेशभ्रमणाला आपलेसे केले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये आयईएलटीएस, जीआरई, टोफेल अशा परीक्षांचा अभ्यास करून विदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करणार्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. कोल्हापुरात असणार्या विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रांमध्ये, स्टडी अब्रॉड कोर्सेससाठी स्वतंत्र सत्रे आयोजित केली जात आहेत.
जिल्ह्यातील लघू व मध्यम उद्योगांशी संलग्न व्यापारीवर्गही व्यावसायिक कारणांसाठी परदेशात जात आहेत. मशिनरी, फौंड्री, सुटे पार्टस्, अन्नप्रक्रिया उद्योग यामध्ये व्यवसाय विस्तारासाठी परदेशभ्रमण होत आहे. अशा व्यापार्यांनी देखील पासपोर्ट मिळवले आहेत.
विदेशात शिक्षण घ्या, अनुभव घ्या आणि पुन्हा भारतात येऊन काहीतरी करा, असा विचार अनेकांच्या मनात आहे. काही परदेशातच स्थायिक होण्याच्या प्रयत्नात आहेत. सरकारच्या विविध योजनांमुळेही लोक जागरूक झाले आहेत. जिल्ह्यातून विदेशात जाणार्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात स्वतंत्र पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची गरज आहे.