kolhapur | बालरुग्णांची संख्या दुप्पट; तापाचा मुक्काम लांबला 
कोल्हापूर

kolhapur | बालरुग्णांची संख्या दुप्पट; तापाचा मुक्काम लांबला

बदलत्या हवामानामुळे विषाणूजन्य संसर्ग वाढला; रुग्णसंख्या दुप्पट

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : कधी ऊन, कधी पाऊस आणि वातावरणातील आर्द्रतेत होणाऱ्या बदलांमुळे सध्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः, दोन ते सात वर्षे वयोगटातील बालरुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, भूक मंदावणे आणि अशक्तपणाच्या तक्रारी वाढल्या आहेत. मागील आठवडाभरात रुग्णसंख्या सुमारे दुप्पट झाल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांकडून नोंदविण्यात येत आहे.

ऋतुबदलाच्या काळात विषाणूंच्या प्रसारास पोषक वातावरण निर्माण होते. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती अद्याप विकसित होत असल्याने त्यांना संसर्गाचा धोका अधिक असतो. अनेक साध्या विषाणुजन्य संसर्गांमध्ये ताप ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्‍त वाढत असून, तो काही दिवसांत ताप कमी होतो; मात्र काही मुलांना पूर्णपणे बरे होण्यासाठी सात ते दहा दिवस लागू शकतात. तापाचा कालावधी वाढल्याने पालकांची चिंता वाढत असली, तरी ताप किती दिवस आहे यापेक्षा मुलाची एकूण प्रकृती आणि लक्षणांमध्ये होणारे बदल अधिक महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

श्वास घेण्यास त्रास, सतत उलट्या, अतिशय सुस्ती, पाणी न पिणे, लघवी कमी होणे किंवा झटके आल्यास विलंब न करता वैद्यकीय उपचार घ्यावेत. पाच दिवसांनंतरही ताप कायम राहिल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक रक्त तपासण्या करणे आवश्यक आहे.

तापाची लक्षणे

थंडी वाजून ताप, सर्दी - खोकला

थकवा, अशक्‍तपणा व अंगदुखी

डोकेदुखी, घसा खवखवणे

भूक मंदावणे व डिहायड्रेशन

हे उपाय करावेत

नियमित हात धुवा; सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा

मुलांना पुरेसे पाणी व द्रवपदार्थ द्या

व्हिटॅमिन ‘सी’सह पौष्टिक आहार द्या

डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याशिवाय औषधे, विशेषतः अँटिबायोटिक्स देऊ नयेत

ताप साधारण तीन ते पाच दिवसांनंतरही कायम राहिला, तर पालकांनी घाबरून न जाता मुलाच्‍या तब्येतीकडे बारकाईने लक्ष द्यावे, प्रकृती खालावत असेल, तर त्‍वरित रुग्णालयात घेऊन जाणे आवश्यक आहे.
डॉ. संगीता कुंभोजकर, बालरोगतज्ज्ञ, सीपीआर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT