नृसिंहवाडी : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील औरवाड मार्गावरील जुन्या पुलावरून अनंत चतुर्दशी निमित्ताने सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे क्रेनद्वारे विसर्जन करण्यात आले. जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाडसह तालुक्यातील सार्वजनिक मंडळांच्या भव्य गणेशमुर्त्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
पारंपरिक वाद्यांच्या निनादात व फुलांच्या उधळणीत दहा दिवसानंतर बाप्पांना भक्तिभावाने निरोप देण्यात आला. घरगुती गणेश मूर्तींसह मंडळांच्या तीन फुटांपासून ते २१ फुटी गणेशमुर्त्यांनी रस्ता फुलून गेला होता. जुन्या औरवाड पुलावरून क्रेनद्वारे गणेश मुर्त्या कृष्णा नदीत विसर्जित करण्यात आल्या.
यावेळी कुरुंदवाड, शिरोळ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, क्रेनद्वारे गणेशमूर्ती थेट नदीच्या प्रवाहापर्यंत पोहचवून विसर्जित करता येत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.