राजेंद्र जोशी
कोल्हापूर : देशातील औषधांच्या वाढत्या किंमतींबाबत रुग्णांना काहीसा दिलासा देणारा निर्णय घेत राष्ष्ट्रीय औषध किंमत निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) 30 औषधीय संयुगांच्या किरकोळ किंमती निश्चित्त केल्या आहेत. मधुमेह, हृदयविकार, अॅलर्जी, जीवनसत्त्वांच्या कमतरता तसेच अवयव प्रत्यारोपणानंतर वापरल्या जाणार्या महत्वाच्या औषधांचा यात समावेश आहे.
केंद्रीय रसायने व खते मंत्रालयाच्या औषध विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, औषध (किंमत नियंत्रण) आदेश 2013 (डीपीसीओ) अंतर्गत या नव्या किमती निश्चित केल्या आहेत. नवीन औषधे या वर्गवारीतील विशिष्ट औषधीय संयुगांसाठी हे दर लागू असून, संबंधित उत्पादक आणि विपणन कंपन्यांना त्याचे पालन बंधनकारक असेल. या आदेशात व्हिटॅमिन डी-3 (कोलेकॅल्सिफेरॉल 60,000 आययू नॅनो ड्रॉपलेट) ओरल सोल्यूशनचा किरकोळ दर प्रतिमिलीलिटर 14.91 रुपये निश्चित केला आहे. हाडांचे आरोग्य, जीवनसत्त्वांची कमतरता आणि मज्जासंस्थेशी संबंधित विकारांवर दिल्या जाणार्या कॅल्शियम, व्हिटॅमिन डी-3, मिथाईलकोबालामिन, एल-मेथिलफोलेट कॅल्शियम आणि पायरीडॉक्सल-5 युक्त औषधांच्याही किमती निश्चित केल्या आहेत.
दीर्घकालीन आजारांवरील औषधांमध्ये कोलेस्टेरॉल नियंत्रणासाठी वापरल्या जाणार्या अॅटोर्वास्टॅटिन आणि फेनोफायब्रेट गोळ्यांची किंमत प्रतिगोळी 18.46 रुपये ठेवण्यात आली आहे. अॅलर्जीवरील बिलास्टीन आणि मॉन्टेल्युकास्ट संयुगाची किंमत 21.22 रुपये प्रतिगोळी निश्चित करण्यात आली असून, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांसाठी वापरल्या जाणार्या बिसोप्रोलॉल फ्युमरेट व अॅम्लोडिपीन संयुगाची किंमत 9.40 रुपये प्रतिगोळी राहणार आहे.
मधुमेहावरील औषधांच्या किमतीही निश्चित केल्या आहेत. एम्पाग्लिफ्लोझिन, सिटाग्लिप्टीन आणि मेटफॉर्मिन एक्स्टेण्डेड रिलीज या संयुगाची किंमत प्रतिगोळी 14.88 रुपये, तर सिटाग्लिप्टीन, ग्लिमेपिराइड आणि मेटफॉर्मिन संयुगाची किंमत 11.91 रुपये प्रतिगोळी ठरविण्यात आली आहे. विशेष लक्षवेधी बाब म्हणजे अवयव प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांसाठी अत्यावश्यक मानल्या जाणार्या टॅक्रोलिमस प्रोलाँग्ड रिलीज 3 मिग्रॅ कॅप्सूलची किंमत प्रतिकॅप्सूल 127 रुपये निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, मंजूर दरांपेक्षा अधिक किंमत आकारणार्या उत्पादक किंवा विपणन कंपन्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही एनपीपीएने दिला आहे. जादा वसूल केलेली रक्कम व्याजासह सरकारकडे जमा करावी लागेल, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. नव्या अधिसूचनेमुळे संबंधित औषधांबाबत यापूर्वी जारी केलेले सर्व किंमत आदेश रद्दबातल ठरणार असून, नव्या दरांची अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने सुरू होणार आहे.
राष्ट्रीय औषध किंमत निर्धारण प्राधिकरणाने निश्चित केलेल्या किमतींमध्ये जीएसटीचा समावेश नसून प्रत्यक्षात कर भरला जात असल्यासच तो स्वतंत्रपणे आकारता येईल. कंपन्यांना नव्या दरांनुसार पॅकची किंमत निश्चित करून अद्ययावत किंमत यादी आयपीडीएमएस प्रणालीवर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच किरकोळ विक्रेते आणि वितरकांनी ही किंमत यादी ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे बंधनकारक राहणार आहे.