कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत झालेल्या ड्रेनेज घोटाळ्याला जबाबदार असणार्या अनेक अधिकार्यांची सध्या चौकशी सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी एकेका घटकाला नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश कांबळे, कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड या तिघांना नोटिसा पाठवून त्यांच्याकडून खुलासा घेतल्यानंतर आता मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, मुुख्यलेखाधिकारी संजय सरनाईक, पवडी अकाऊंटंट अधीक्षक बळवंत सूर्यवंशी यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून तत्काळ स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
महापालिकेत 85 लाख रुपयांचे बिल काम न करताच उचलल्याचे प्रकरण माजी नगरसेवक व शिवसेना शिंदे गटाचे समन्वयक सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन बाहेर काढले. त्यानंतर दोन तासाच्या आतच संबंधित ड्रेनेजचे काम केलेला ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांनी कबुलीजबाब देत महापालिकेकडे 85 लाख रुपयांचा भरणा करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. पवडी अधीक्षकांपासून ते मुख्य लेखापरीक्षकांपर्यंत सर्वांचीच या प्रकरणात जबाबदारी असून, डोळेझाक झाल्यामुळे संबंधित ठेकेदाराने एवढे धाडस केल्याचे बोलले जात आहे. काम न करताच बिल उचलणे हा यापूर्वी झालेल्या घोटाळ्यांपेक्षा एक कहरच मानला जात आहे.
हार्ड कॉफी आणि ऑनलाईन अशा दोन प्रकारे ही बिले प्राप्त झाली आहेत. ऑनलाईन बिलासंदर्भात प्रत्येकाने आपली ‘डिजिटल की’ वापरली आहे. त्यामुळे खोट्या सह्या आहेत, असे म्हणून प्रकरणातून अंग झटकता येणार नाही. ‘डिजिटल की’ ज्याच्या नावे आहेत, त्यानेच ती वापरायची असल्याने त्यांच्या कीमधूनच हे बिल पास झाले आहे. त्यामुळे चौकशी नि:पक्षपातीपणे झाली, तर सगळेच जण अडकण्याची शक्यता आहे.