कोल्हापूर : सांडपाणी प्रक्रियेचा अपुरा प्रकल्प, त्याची अशास्त्रीय साठवण यांसह पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाने बुधवारी शिवाजी विद्यापीठाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, 1974 आणि वायू (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, 1981 अंतर्गत ही कारवाई केली आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या आधिसभेत सदस्यांनी सांडपाणी प्रकल्प, तसेच विद्यापीठात होत असणार्या पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाबाबत प्रशासनास धारेवर धरले होते. अधिसभेत हा विषय जोरदार खडाजंगी होऊन गाजला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी विद्यापीठात पाहणी केली असता येथे अनेक त्रुटी आढळून आल्या. सांडपाण्याची अशास्त्रीय साठवण, घनकचर्याचे वर्गीकरण न करणे, प्रयोगशाळांमधील धोकादायक कचर्याच्या विल्हेवाटीबाबत परवानग्या न घेणे असे प्रकार आढळून आले. विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहातील एसटीपी प्लँट बंद अवस्थेत असून त्याचे अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे.
मुलांच्या व इतर वसतिगृहांमध्ये सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उपलब्ध नसल्याचे अधिकार्यांना दिसून आले. मुख्य इमारतीतून निर्माण होणारे सांडपाणी कोणत्याही वैज्ञानिक प्रक्रियेशिवाय साठवून बागकामासाठी वापरले जात असल्याचेही निदर्शनास आले. विद्यापीठाने पाण्याचा वापर व सांडपाणी निर्मितीची अचूक माहिती सादर केली नाही. या सर्व त्रुटीनुसार विद्यापीठाने सात दिवसांच्या आत आपले म्हणणे द्यावे, अन्यथा पुढील कोणतीही सूचना न देता कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी निखील घरत यांनी दिला आहे.