कोल्हापूर : उमेदवारी अर्ज मोफत उपलब्ध होणार आहे. मात्र, उमेदवारी अर्जासोबत सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला दहा हजार, तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवाराला पाच हजार रुपये अनामत रक्कम रोख भरावी लागणार आहे. उमेदवाराला 40 लाख खर्चाची मर्यादा आहे. याखेरीज पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्रही सादर करावे लागणार आहे. यासह उमेदवारी अर्ज भरण्याबाबत विविध सूचना कोल्हापूर उत्तर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींना सोमवारी घेतलेल्या बैठकीत दिल्या.
एका व्यक्तीला जास्तीत जास्त 4 उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. अर्जातील भाग एक ते भाग तीन अ मधील कोणताही रकाना निरंक ठेवू नये. निरंक असल्यास त्यामध्ये निरंक किंवा लागू नाही, असे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. उमेदवारी अर्ज उमेदवार स्वतः किंवा त्याचा सूचक दाखल करू शकतो. नोंदणीकृत मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या उमेदवाराला उमेदवारी अर्जासाठी एका सूचकाची आवश्यकता आहे. तसेच नोंदणीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवाराला दहा सूचकांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरण्याच्या किमान एक दिवस आधी निवडणूक खर्चाकरिता स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे. सदर बँक खाते हे उमेदवार यांचे वैयक्तिक किंवा उमेदवार व त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांच्या नावावर संयुक्तपणे उघडता येईल. त्याचा क्रमांक व पासबुकचे प्रथम नोंदीची पानाची छायांकित प्रत उमेदवारी अर्जासोबत सादर करावी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.