शिरोली पुलाची/ नागाव : गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करून डीजेचा मोठा आवाज आणि मिरवणूक ताटकळत ठेवल्याप्रकरणी नागाव येथील १० तरुण मंडळांसह संबंधित पदाधिकारी, सदस्य, डीजे मालक, चालक आणि वाहनमालकांविरोधात शिरोली एमआयडीसी पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
यामध्ये विसर्जन मिरवणूक ताटकळत ठेवल्याप्रकरणी नागाव येथील रायगड तरुण मंडळ, छत्रपती शिवाजीप्रणीत सावंत ग्रुप, मर्द मराठा तरुण मंडळ, सनी स्पोर्टस् या मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव, डीजे मालक व वाहनचालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तर मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात गाणी लावून ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यात आला. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला व सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याची तक्रारीत नोंद आहे.
सूचनांचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी सुभाष गल्ली मित्र मंडळ, पर्सनल पॉवर, जीटीएम, अण्णा भाऊ साठे मंडळ, पाटाकडील तरुण मंडळ, देशप्रेमी तरुण मंडळ यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, डीजे मालक आणि ट्रॅक्टरचालक अशा जवळपास १२० लोकांवर पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तसेच ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमावली २००० मधील तरतुदींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शिरोली पोलिस ठाण्याचे सपोनि सुनील गायकवाड, अमित पांडे, नीलेश कांबळे, चंद्रकांत कोळी यांनी दिली.