कोल्हापूर : एमडीआर शुल्काच्या विरोधात व्यापाऱ्यांनी पापाची तिकटी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केली.  (छाया : मिलन मकानदार )
कोल्हापूर

kolhapur | ‘नो यूपीआय डे’मुळे कोट्यवधींच्या व्यवहारावर परिणाम; व्यापारी एकवटले, पापाची तिकटी येथे निदर्शने

१५ ऑक्टोबरपर्यंत शुल्क मागे न घेतल्यास यूपीआय बंदचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दोन हजार रुपयांवरील यूपीआय व्यवहारांवर प्रस्तावित असलेल्या व्यापारी सवलत शुल्काच्या (एमडीआर) विरोधात शहरातील व्यापारी वर्ग शुक्रवारी पूर्ण ताकदीने एकवटला. व्यापाऱ्यांनी २ ऑक्टोबर रोजी ‘नो यूपीआय डे’ पाळून डिजिटल व्यवहार नाकारल्याने दिवसभरात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार रोखीनेच झाले. मात्र, अचानक रोख रकमेचा वापर वाढल्याने आणि बाजारात सुट्ट्या पैशांची टंचाई निर्माण झाल्याने खरेदी-विक्रीच्या व्यवहारात व्यापारी व ग्राहक दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी मार्गावरील दुकानांमध्ये ‘नो यूपीआय डे’ची पत्रके वाटण्यात आली. व्यापाऱ्यांनी ऑनलाईन पेमेंटचे क्यूआर कोर्ड दिवसभर झाकून ठेवले. गांधी जयंती दिनी पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून व्यापाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. ‘नो यूपीआय, ओनली कॅश’, ‘व्यापारी एकता जिंदाबाद’ आणि ‘व्यापारी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी महाद्वार रोड परिसर दणाणून सोडला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक आंदोलनाच्या तत्त्वांचा संदर्भ घेत शांततामय आणि लोकशाही मार्गाने हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात चेंबरचे माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, खजानीस विज्ञानंद मुंढे, माजी उपाध्यक्ष संजय पाटील, संचालक जयेश ओसवाल, संपत पाटील, राहुल नष्टे, संभाजीराव पोवार, प्रशांत पोकळे, लक्ष्मण पटेल, अनिल धडाम, सचिन शानबाग, संजीव परीख, राजेश राठोड, शाम जोशी, सुरेश लिंबेकर, श्रीनिवास मिठारी, अरुण सावंत, रमेश कारवेकर, अतुल होनोले, विनोद पटेल, अविनाश नासिपुडे, गुरुदत्त म्हाडगुत, संदीप वीर, मंदार धर्माधिकारी, दीपक बोधे यांच्यासह विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दृष्टिक्षेपात कोल्हापुरातील यूपीआय व्यवहार व शुल्क

१२ लाख : कोल्हापुरात होणारे एकूण सरासरी दैनिक यूपीआय व्यवहार

८० ते ८५% : एकूण व्यवहारांपैकी वैयक्तिक (P2P) व्यवहारांचे प्रमाण (विनामूल्य)

२,००० : प्रस्तावित शुल्क आकारणीसाठी व्यवहाराची किमान मर्यादा

०.४% : प्रस्तावित व्यापारी सवलत शुल्क (MDR)

१८% : एमडीआर शुल्कावर लागू होणारा जीएसटी (GST)

०.४७% : कर धरून व्यापाऱ्यांवर पडणारा प्रत्यक्ष अंतिम आर्थिक भार (अर्धा टक्का)

२ ते ३% : किरकोळ व्यापाऱ्यांचे सरासरी नफ्याचे प्रमाण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT