सुनील कदम
कोल्हापूर : मागील पंधरा-वीस वर्षांच्या कालावधीत अधिकृतपणे भारतात आलेले तब्बल 12 लाख बांगला देशी नागरिक भारतात येऊन नंतर गायब झालेले आहेत. गेल्या कित्येक वर्षांत या अधिकृत घुसखोरांचा थांगपत्ता लागलेला नाही. यापैकी बहुतांश घुसखोर महाराष्ट्रातच लपून बसले असण्याची दाट शक्यता आहे.
इथे आले, गायब झाले!
पर्यटन, व्यापार, शिक्षण, उद्योग-व्यवसाय यासह अन्य विविध कारणांनी दरवर्षी भारतात येणार्या बांगला देशी नागरिकांची संख्या दीड ते दोन लाखांच्या घरात आहे. हे लोक अधिकृत पासपोर्ट-व्हिसा घेऊन भारतात येतात आणि त्यांच्या व्हिसाची मुदत संपली की, परत जातात. मात्र, मागील पंधरा-वीस वर्षांच्या कालावधीत अधिकृतपणे भारतात येऊन नंतर परत न जाता इथेच कुठेतरी गायब झालेल्या बांगला देशी नागरिकांची संख्या थोडी थोडकी नाही, तर तब्बल 12 लाख इतकी आहे. जरी या लोकांनी अधिकृत मार्गाने देशात प्रवेश केला असला, तरी आता त्यांच्या व्हिसाची मुदत संपून गेली तरी ते परत न गेल्यामुळे ते घुसखोरच ठरतात. ज्याअर्थी ही मंडळी भारतात येऊन नंतर इथेच कुठेतरी गायब झाली आहेत, त्याअर्थी त्यांचा इथे येण्याचा हेतू निश्चितच चांगला नसणार. कोणत्या तरी कारणाने भारतात येऊन इथे भलत्याच उचापती करण्याचा त्यांचा हेतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिकृतपणे इथे येऊन नंतर गायब झालेल्या या घुसखोरांचा आधी शोध घेण्याची आवश्यकता आहे.
महाराष्ट्रातच असणे शक्य
बांगला देशातील भारतात घुसखोरी करणार्या बहुतांश घुसखोरांची पहिली पसंती असते ती महाराष्ट्र आणि त्यातही पुन्हा मुंबई! त्यामुळे अधिकृतपणे भारतात येऊन नंतर गायब झालेले बहुतांश बांगला देशी घुसखोर महाराष्ट्रात आणि त्यातही प्रामुख्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात दडी मारून बसले असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे एखादी व्यापक मोहीम राबवून मुंबई-नवी मुंबई-ठाण्याचा कानाकोपरा चाळून काढून या घुसखोरांचा शोध घेऊन त्यांना परत बांगला देशात पिटाळून लावण्याची गरज आहे; अन्यथा कोणत्याही क्षणी राज्याला आणि मुंबईला त्याची जबर किंमत मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे अधिक धोकादायक
बांगला देशातून भारतात घुसखोरी करणारे जवळपास 90-95 टक्के घुसखोर हे तिथल्या भिकेकंगालीला आणि भुकेकंगालीला वैतागून केवळ पोटापाण्यासाठी म्हणून भारतात अनधिकृत मार्गाने घुसखोरी करतात; पण साळसूदपणाचा आव आणून अधिकृतरीत्या भारतात येऊन नंतर इथल्याच कुठल्या तरी बिळात दडी मारून बसणार्या घुसखोरांचा हेतू निश्चितच चांगला नसावा. पर्यटन किंवा अन्य कोणत्या कारणाने भारतात प्रवेश करून नंतर इथे देशविरोधी कारवाया करण्याचा त्यांचा हेतू असू शकतो. त्यामुळे या अधिकृत घुसखोरांनी राज्याच्या सुरक्षिततेला आव्हान देण्यापूर्वीच त्यांचा शोध घेऊन नि:पात करण्याची गरज आहे.
ओळखपत्रे तपासण्याची गरज
बांगला देशातून भारतात घुसखोरी केलेल्या बहुतांश घुसखोरांकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र आदी बनावट ओळखपत्रे आहेत, ज्या कागदपत्रांची कधी फारशी छाननी होत नाही; पण या घुसखोरांचा राज्याला असलेला धोका विचारात घेऊन मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबईसह संपूर्ण राज्यभरात ओळखपत्रे तपासण्याची एक विशेष मोहीमच हाती घेण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातही महसूल आणि पोलिस यंत्रणेने संयुक्तपणे अशी एखादी मोहीम राबविण्याची गरज आहे. आजकाल सडलेल्या शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून अनेक घुसखोर बांगला देशी वेगवेगळ्या शासकीय योजनांचे लाभार्थी झाले आहेत, शासनाच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या डल्ला मारत सुटले आहेत, अशांचा खोलात जाऊन शोध घेण्याची आवश्यकता आहे; अन्यथा एक दिवस हे घुसखोर स्थानिकांवर शिरजोर झाल्याशिवाय राहणार नाहीत.
अपनी बिरादरीवाला म्हणण्याआधी करा चौकशी
अनेकवेळा स्थानिक लोकांकडून कळत नकळतपणे या घुसखोरांचे बस्तान बसविण्यासाठी हातभार लावला जातो. बनावट ओळखपत्रांमुळे हे बांगला देशी घुसखोर परप्रांतीय मुस्लिम बिरादरीचेच वाटतात; परिणामी त्यांना स्थानिकांकडून सर्व ती प्राथमिक मदत मिळत जाते आणि हळूहळू ते इथेच मिसळूनही जातात; पण घुसखोरी केलेले बहुतांश बांगला देशी हे वेगवेगळ्या अवैध व्यवसायाशी निगडित आहेत. अनेक गुन्हेगारी कृत्यांमध्ये त्यांचा हात दिसून येतो. काहींचा तर दहशतवादी संघटनांशी संबंध आहे. त्यामुळे केवळ नामसाधर्म्यामुळे कुणालाही परप्रांतीय किंवा ‘अपनी बिरादरीवाला’ म्हणण्यापूर्वी स्थानिकांनी त्याची चौकशी करण्याची गरज आहे.