कोल्हापूर : शिवाजी कोण होता? पुस्तकाचे लेखक प्रशांत आंबी यांना धमकी देणारे आ. संजय गायकवाड यांच्यावर 24 तास उलटूनही गुन्हा दाखल होत नाही. तुमच्यावर गृह खात्याचा दबाव आहे का, असा सवाल करीत पुरोगामी कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारला. कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पोलिस हतबल झाले होते. कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आ.गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. रात्री उशीरा गुन्हा नोंद झाला.
आ. गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखलसाठी इंडिया आघाडी व पुरोगामी कार्यकर्ते, आ. रोहित पवार राजारामपुरी पोलिस ठाण्यात आले होते. आ. पवार म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकरणाबाबतचा अनुभव खूप वाईट आहे. आंबी यांना धमक्या येत आहेत, त्यांना संरक्षण द्या. आई-बहिणींना अर्वाच्च शिवीगाळ करणार्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली. गिरीश फोंडे म्हणाले, आ. गायकवाड यांनी फोनवर धमकी दिल्याची कबुली दिली आहे, मग त्यांना स्पेशल वागणूक का? सतीशचंद्र कांबळे म्हणाले, आ. गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज, कॉ. पानसरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत. तरीही पोलिस पळवाट काढत आहेत.
पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी अभिप्राय आल्यावर कारवाई करू, पोलिस जाणीवपूर्वक वेळ काढत नाहीत, असे सांगितले. आ. गायकवाड यांनी आंबी यांची पत्नी, आईला शिवीगाळ केली. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा. पोलिस प्रशांत आंबी यांचा खून पडण्याची वाट पाहत आहे का? असा उद्विग्न सवाल आरती रेडेकर यांनी केला. माजी महापौर आर. के. पोवार, शिवसेनेचे नेते विजय देवणे, राजेश लाटकर, अॅड. दत्ताजी कवाळे, सीमा पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडली. यावेळी व्ही. बी. पाटील, माजी आ. राजीव आवळे, स्मिता पानसरे, दिलीप पवार, रघुनाघ कांबळे, भरत रसाळे, रोहित पाटील उपस्थित होते.
28रोजी मोर्चा
बुलडाण्यातील आ. गायकवाड यांच्या घरावर कोल्हापुरातील पुरोगामी संघटना, कार्यकर्ते 28 एप्रिल रोजी मार्चा काढणार आहेत. याप्रसंगी कॉ. पानसरे लिखीत शिवाजी कोण होता? पुस्तकाचे सामूहिक वाचन केले जाणार आहे.