कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून झालेली चर्चा ही फक्त पुण्यापुरती मर्यादित होती. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीशी त्याचा काही संबंध नाही, असे काँग््रेासचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविण्याची भूमिका काँग््रेासने घेतली आहे. त्यानुसार जागावाटपाबाबत चर्चादेखील सुरू आहेत. काही जागांबाबत मतभेद आहेत हे खरे आहे; पण चर्चेतून मार्ग काढण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. आघाडीतील सर्व पक्षांकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने जागावाटपाच्या प्रक्रियेला थोडा वेळ लागणारच. एका बैठकीत जागावाटप निश्चित कधी होत नाही. माघारीपर्यंत जागावाटपाची चर्चा सुरूच राहते, असे पाटील यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला होता, हे खरे आहे. त्यांनी आपण एकत्रित निवडणूक लढविण्याबाबत चर्चा केली; पण ही चर्चा केवळ पुणे महापालिकेसंदर्भात होती. त्याचा कोल्हापूर किंवा इचलकरंजी महापालिकांच्या निवडणुकीशी काही संबंध नाही. मुश्रीफ यांनी मैत्रीचे दोर आता तुटले, असे म्हटले होते. त्यावर आपणास माध्यमांनी विचारले तेव्हा आपण मैत्रीची दोर पुन्हा बांधता येतात, असे गमतीने म्हटले होते. याचा अर्थ कोल्हापुरात आपण राष्ट्रवादीसोबत जाणार असा होत नाही, असेही आमदार पाटील म्हणाले.