वारणानगर, पुढारी वृत्तसेवा : येथील श्री वारणा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निपुण विलासराव कोरे (वारणानगर) यांची, तर उपाध्यक्षपदी उत्तम बाबासो पाटील (लाटवडे) यांची बिनविरोध फेरनिवड झाली.
वारणा बँकेची सन 2023 ते 2028 सालासाठीची पंचवार्षिक निवडणूक वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, आ. डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली व विद्यमान अध्यक्ष निपुण कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग चौथ्यांदा बिनविरोध झाली.
सोमवारी बँकेच्या सभागृहात पन्हाळ्याचे सहकारी संस्था सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी नारायण परजणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत निपूण विलासराव कोरे (वारणानगर) यांची, तर उपाध्यक्षपदी उत्तम बाबासो पाटील (लाटवडे, ता. हातकणंगले) यांची बिनविरोध फेरनिवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी यांनी केली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सार्दळ यांनी नूतन पदाधिकार्यांचे स्वागत केले.
यावेळी अध्यक्ष निपुण कोरे म्हणाले, वारणा बँकेची पंचवार्षिक निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध करून सभासदांनी आमच्यावर विश्वास टाकला आहे. विश्वासाच्या जोरावर बँकेने नेत्रदीपक प्रगती साधली आहे. बँकेच्या महाराष्ट्रात 40 शाखा कार्यरत आहेत. सर्व शाखा अद्यावत सर्व सुविधांनी युक्त, कोअर बँकिंग शी जोडलेले आहेत. आर्थिक वर्षात वार्षिक 1500 कोटी रुपयांची उलाढाल केली असून, सध्या 948 कोटी रुपयांच्या ठेवी व 584 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. लवकरच एक हजार कोटी रुपये ठेवींचा टप्पा बँक पूर्ण करेल, असा विश्वास अध्यक्ष निपुण कोरे यांनी व्यक्त केला.
यावेळी ज्येेष्ठ संचालक प्रमोद कोरे, महादेव चावरे, अरविंद बुद्रुक, बाबासो बावडे, बळवंत पाटील, प्रताप पाटील, विनायक बांदल, अभिजीत पाटील, प्रकाश माने, प्रभाकर कुरणे, संजय जमदाडे, प्रशांत जमने, नानासो दुर्गाडे, सुवर्णा राजेंद्र माने, महानंदा घुगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सार्दळ, जनरल मॅनेजर प्रकाश डोईजड, पी.टी. पाटील यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.