संतोष बामणे
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात गेल्या 7 महिन्यांत 9 खून झाल्याने खळबळ उडाली आहे. जयसिंगपूर, शिरोळ व कुरूंदवाड या तीन पोलीस ठाण्यांबरोबर जिल्हा पोलीस प्रमुखांसमोर खुनाचे सत्र रोखण्याचे आव्हान आहे.
उदगाव, धरणगुत्ती, शिरोळ, हरोली, तमदलगे, शिरोळ, मौजे आगर, कुरूंदवाड येथील एकापाठोपाठ एक खून होत असतानाच बुधवारी चिपरी (ता. शिरोळ) येथे युवकाचा पाठलाग करून खून केल्याची घटना घडली. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर, शिरोळ व कुरूंदवाड अशी तीन शहरे व अब्दुललाट, उदगाव, नांदणी व दानोळी अशा 4 निमशहरी गावांसह 52 गावांचा भार येथील पोलीस ठाण्यांना पेलत नाही. या शहरांसह उदगाव, शिरोळ, कुरूंदवाड, अब्दुललाट, दत्तवाड येथील गुन्हेगारी व घटनांनी सातत्याने तालुका चर्चेत येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून खून, दरोडे, विनयभंग, चोरी यासह संवेदनशील घटनांत वाढ झाली आहे.
खुनाच्या सत्रामुळे तर नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे पोलिसांकडून यावर अंकुश ठेवण्यासाठी काहीही उपाययोजना करण्यात येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील पोलिसांचा गुन्हेगारीतील प्रवृत्तीवर धाक राहिला नसल्याचे चित्र आहे.
तीन पोलीस ठाणी व विभागीय पोलीस अधीक्षक कार्यालय आहे; पण तरीही चोर्या, विनयभंग, अवैध व्यवसाय, फसवणूक यासह संवेदनशील प्रकार होत आहेत. खुनाच्या सत्रामागे अवैध धंद्यांचेही कारण आहे.
9 फेब्रुवारी : उदगाव येथे विपुल चौगुले याचा जुन्या वादातून खून
5 मार्च : धरणगुत्तीत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला.
19 मे : शिरोळ येथे रिल्सच्या कारणावरून राजू कोलप याची हत्या
19 मे : हरोलीत पाण्याच्या वादातून विजय मुगुळखुडे यांचा खून
28 मे : तमदलगे येथे भावानेच सुपारी देऊन भावाची हत्या केली.
9 जून : शिरोळ येथे दीपक मगदूम याचा जुन्या भांडणातून खून
14 जून : मौजे आगर येथील गणेश पाटील याची जुन्या वादातून हत्या
7 जुलै : कुरुंदवाड येथे किरकोळ वादातून अक्षय चव्हाण याचा खून
6 ऑगस्ट : चिपरी येथे संदेश शेळके याचा पाठलाग करून निर्घृण खून