कोल्हापूर : दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक, ‘पुढारी’कार डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या पाठपुराव्याने वृत्तपत्र विक्रेता महामंडळ स्थापन झाले. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी महामंडळ झालेच पाहिजे, अशी कणखर भूमिका घेऊन त्याकरिता योगदान देणारे वर्तमानपत्राचे हे एकमेव मालक आहेत, अशा भावना वृत्तपत्र विक्रेत्यांनी गुरुवारी व्यक्त केल्या. हे महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल, याकरिता आपण सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सोबत असल्याची ग्वाही डॉ. जाधव यांनी यावेळी दिली.
राज्य मंत्रिमंडळाने वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वृत्तपत्र विक्रेता संघटनांच्या पदाधिकार्यांनी ‘पुढारी भवन’ येथे डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेतली. डॉ. जाधव यांना पेढा भरवत या महामंडळासाठी केलेल्या पाठपुराव्याबाबत आणि याकरिता दिलेल्या योगदानाबाबत त्यांचे आभार मानले.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे म्हणाले, गेली 14 वर्षे कल्याणकारी महामंडळासाठी लढा उभारला होता, त्याला आपल्यामुळे यश आले. याबाबत जी जी आंदोलने केली, त्याद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यातही यश येत नव्हते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात डॉ. जाधव यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महामंडळ स्थापन झाल्याखेरीज आपण स्वस्थ बसणार नाही, या महामंडळासाठी प्रत्येक टप्प्यावर तुमच्या सोबत असेन, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार केलेल्या पाठपुराव्याने ते यश आज आपण मिळवून दिले, अशी आमची भावना आहे.
या निर्णयाने आमची आजच दिवाळी साजरी झाली आहे. या महामंडळासाठी भरघोस निधी उपलब्ध व्हावा व त्यातून वृत्तपत्र विक्रेत्यांसह संबंधित सर्व घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जाव्यात. बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या धर्तीवर हे मंडळही कार्यरत व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पोवार, सचिव विकास सूर्यवंशी, संघटनेचे मार्गदर्शक व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शिवगोंडा खोत, राज्य संघटनेचे संचालक आण्णा गुंडे आदींसह सर्व कार्यकारिणी सदस्य, एकसंध सभासद यांच्या प्रयत्नाला आपण बळ दिले, त्यामुळे आज हे यश मिळाल्याचे कांबळे यांनी सांगितले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनीही या महामंडळासाठी योगदान दिले, असे सांगत मुलांच्या शिक्षणांचा खर्च, आरोग्य सुविधा, त्याकरिता विमा सुविधा, घरकुल योजना, शहरात सार्वजनिक ठिकाणी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून देणे आदी सुविधा या मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात, अशा भावना कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनचे अध्यक्ष किरण व्हनगुत्ते, कोल्हापूर शहर महानगर संघटनेचे अध्यक्ष रवी लाड, संघटनेचे संघटक शंकर चेचर यांनी व्यक्त केल्या. यावेळी रणजित आयरेकर, सतीश दिवटे, सुरेंद्र चौगले, सागर रुईकर, सुरेश ब्रह्मपुरे, समीर कवठेकर, परशुराम सावंत, धनंजय शिराळकर, आसिफ मुल्लाणी, अंकुश परब, अमर जाधव, रवी खोत, महेश घोडके, इंद्रजित पवार उपस्थित होते.
आपल्या मागणीप्रमाणे पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळाचे निर्णय झाले पत्रकारांसाठी व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी डॉ. जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. तसे पत्रही शिंदे यांना देण्यात आले होते. यानंतर डॉ. जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दूरध्वनीवरून महामंडळ स्थापन करणे किती आवश्यक आहे, याची माहिती देऊन त्याबाबत आचारसंहितेपूर्वीच निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता यांच्याकरिता स्वतंत्र दोन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयातून डॉ. प्रतापसिंह जाधव यांना दूरध्वनी करून आपल्या मागणीप्रमाणे पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता महामंडळाची स्वतंत्र स्थापना केल्याची माहिती दिली.