कोल्हापूर : भाजपच्या नूतन जि. प. व पंचायत समिती सदस्यांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

kolhapur | जिल्ह्यात भाजपच मोठा भाऊ : चंद्रकांत पाटील

जि.प. नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार : अध्यक्ष महायुतीचाच

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक मते मिळाल्याने भाजपच मोठा भाऊ आहे. जिल्हा परिषदेत महायुतीचे संख्याबळ 51 झाले आहे. सत्ता संपादनासाठी काहींनी प्रयत्न करून बघितले. काही होत नाही म्हटल्यावर ते आपल्या कामाला लागले आहेत. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार, असा दावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

पक्षाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. भाजप कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या 12 आणि पंचायत समितीच्या 24 सदस्यांचा सत्कार करण्यात आला. मंत्री पाटील म्हणाले, काँग्रेसचा बालेकिल्ला असणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यात महापालिका, जि. प. व सर्व संस्था काँग्रेसच्या ताब्यात आहेत. तरीही भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टामुळे सध्या जिल्ह्यात भाजपच मोठा भाऊ झाला आहे.

जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येणार आहे. सर्वांना पदे मिळणार आहेत, असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, सकाळी एका ठिकाणी असणारा दुपारी कुठे असेल हे सांगता येत नाही, अशी राजकीय स्थिती झाली आहे. अशावेळी भाजपच्या विजयी उमेदवारांनी निष्ठा, सातत्य कायम ठेवले पाहिजे. 22 फेब—ुवारीस एक लाख बुथवर ‘मन की बात’ ऐकण्यास सर्वांनी एकत्र यावे. संघटनेचे काम वाढवा, जनतेला न्याय देण्याचे काम करा, त्यासाठी प्रसंगी पीए नेमावा.

जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी प्रास्ताविकात नूतन सदस्यांना कामकाजाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास माजी मंत्री भरमू सुबराव पाटील, प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, समरजित घाटगे, माधवराव घाटगे, महेश जाधव, अंबरिश घाटगे, सावकार मादनाईक, राहुल चिकोडे, विजय जाधव यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...तरीही काहीजण गुलालात नाचले!

प्रत्येक राजकीय पक्षांची जिल्हा परिषदेतील मतांची आकडेवारीच जाहीर करून भाजपच मोठा भाऊ असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी, सदस्यांनी आता मिरवले पाहिजे, असे सांगून खा. धनंजय महाडिक यांनी गतवेळच्या 27 जागा यंदा 14 वर येऊन पराभव झाला तरीही काहीजण गुलालात नाचले, असा टोला आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला.

मनपात विविध समितींवर संधी देणार

महापालिकेत भाजपचा महापौर झाला आहे. स्थायी समितीसह विविध समित्यांवर पदाधिकारी निवडले जातील. समाजातील विविध वंचित समाजाना स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली जाणार आहे. सव्वा वर्षाचा स्वीकृत नगरसेवक कालावधी ठेवून पाच वर्षांत 12 लोकांना संधी जाणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची आगामी निवडणूक भाजप लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT