धीरज बरगे
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत ठरावधारकांनी समविचारी आघाडीच्या पारड्यात स्पष्ट बहुमत टाकले. २५ पैकी १३ संचालक निवडून देत सत्तेचा कौल दिला; मात्र अध्यक्ष निवडीच्या वेळी ‘गोकुळ’च्या पोटनियमाने या बहुमतापुढेच कायदेशीर अडथळा उभा केला. लोकशाहीने सत्ता दिली; पण पोटनियमाच्या गणिताने सत्तेचा मार्ग रोखला, अशी ‘गोकुळ’मधील सध्याची राजकीय परिस्थिती आहे. गुरुवारी अध्यक्ष निवडीची सभा गणपूर्तीअभावी तहकूब झाल्यानंतर ‘गोकुळ’मधील सत्तासंघर्ष आता अधिकच तीव्र झाला असून, तो आता न्यायालयात पोहोचला आहे.
निवडणुकीत १३ संचालकांचे संख्याबळ असलेल्या समविचारी आघाडीला अध्यक्षपद मिळणे राजकीयदृष्ट्या अपेक्षित होते. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक गणपूर्तीच्या मुद्द्यावर महायुतीने सभेपासून दूर राहण्याची भूमिका घेतली. परिणामी, १२ संचालकांचे संख्याबळ असलेल्या महायुतीला प्रत्यक्षात महत्त्व प्राप्त झाले. बहुमत असूनही अध्यक्ष निवडता येत नसेल, तर निवडणुकीतील जनमताचा अर्थ काय, असा सवाल समविचारी आघाडीकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, समविचारी आघाडीकडून समांतर सभा घेऊन अध्यक्ष निवडीचा मार्ग स्वीकारला. मात्र, या सभेत झालेली निवड कायदेशीरदृष्ट्या वैध ठरणार की नाही, यावरही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे समांतर सभेतील अध्यक्ष निवड वैध ठरविण्यासाठी ‘समविचारी’ने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे ‘गोकुळ’मधील सत्तेचा फैसला आता सभागृहाबरोबरच न्यायालयीन लढाईतही होण्याची चिन्हे आहेत.
महायुतीच्या पराभवाची सल वक्तव्यांतून उघड
‘गोकुळ’च्या निवडणुकीतील पराभव महायुतीच्या नेत्यांच्या जिव्हारी लागल्याचे त्यांच्या वक्तव्यांवरून दिसत आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या मनातील सल उघडपणे बोलून दाखविली. तर, गोव्यात झालेल्या बैठकीत महायुतीच्या एका बड्या नेत्यानेही मुख्यमंत्र्यांचा दाखला देत काहीही झाले तरी सतेज पाटील यांना ‘गोकुळ’ची सत्ता मिळू द्यायची नाही, अशी भूमिका मांडल्याची चर्चा आहे. या घडामोडी पाहता ‘गोकुळ’ची निवडणूक संपली असली, तरी सत्तासंघर्ष संपलेला नाही. उलट, निवडणुकीतील पराभवाचे राजकीय रूपांतर आता अध्यक्षपदाच्या लढाईत होताना दिसत आहे.
आ. सतेज पाटील यांची आता खरी कसोटी
‘गोकुळ’ निवडणुकीत आ. सतेज पाटील यांच्या समविचारीला बहुमत मिळाले. महायुतीमधील अंतर्गत नाराजी, आ. पाटील यांनी आखलेली नियोजनबद्ध रणनीती यामुळे त्यांना यश मिळाले. ठरावधारकांनी त्यांना बहुमत दिले असले, तरी ‘गोकुळ’च्या पोटनियमाने त्यांना सत्तेच्या सीमारेषवर रोखले आहे. त्यामुळे महायुतीने आखलेले पोटनियमाचे चक्रव्यूह भेदून सत्तेची सीमारेषा ओलांडताना आ. पाटील यांची खरी कासोटी लागणार आहे.
महायुतीने वाढवली ‘समविचारी’ची धाकधूक
मंत्री मुश्रीफ यांनी नंदुरबारमध्ये बोलताना, भविष्यात शशिकांत पाटील-चुयेकर यांना अध्यक्ष करण्याची जबाबदारी आम्हालाच घ्यावी लागेल, असे सूचक वक्तव्य केले. तर, शुक्रवारी कोल्हापूरमध्ये ‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीच्या पुढील सभेला आमचे संचालक उपस्थित राहतील, असेही सांगितले. मंत्री मुश्रीफ यांच्या वक्तव्यांनी फोडाफोडीच्या राजकारणाच्या संशयाचा धागा तयार झाला आहे. त्यामुळे बहुमत असलेल्या ‘समविचारी’ची महायुतीने धाकधूक वाढविली आहे.