Kolhapur Gokul Dudh Sangh  Pudhari
कोल्हापूर

Gokul Chairman Election | ‘समविचारी’ला एका संचालकाची गरज; महायुतीच्‍या भूमिकेकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ, गोकुळच्‍या चेअरमन निवडीतही बैठकीच्‍या कोरमवरून नवा ट्विस्‍ट निर्माण झाला आहे. कोरम पूर्ण करण्‍यासाठी आ. सतेज पाटील यांच्‍या समविचारी आघाडीला एका संचालकाची गरज आहे. सभेचा कोरम पूर्ण न झाल्‍यास चेअरमन निवडीची बैठकच अडचणीत येण्‍याची शक्‍यता असल्‍याने आता महायुतीच्‍या भूमिकेकडे लक्ष राहील. त्‍यामुळे चेअरमन निवडीत संचालकांची पळवापळवी होणार की शशिकांत पाटील-चुयेकर यांना संधी मिळणार, याकडे जिल्‍ह्याचे लक्ष असणार आहे.

गोकुळ निवडणुकीत आ. सतेज पाटील यांच्‍या समविचारी आघाडीला स्‍पष्‍ट बहुमत मिळाले आहे. मात्र, चेअरमन निवड बैठकीबाबत गोकुळचा बैठक कोरमच्‍या असलेल्‍या पोटनियमावरून नवा वाद उफाळला आहे. पोटनियमानुसार बैठकीचा कोरम पूर्ण करण्‍यासाठी बैठकीला १४ संचालकांची उपस्‍थिती महत्त्‍वाची आहे. दोन्‍ही आघाड्यांकडे सभेचा कोरम पूर्ण करणारी संचालक संख्‍या नाही. आ. पाटील यांच्‍याकडे १३, तर महायुतीकडे १२ संचालक आहेत. कोरम पूर्ण करण्‍यासाठी आ. पाटील यांनी एक, तर महायुतीला दोन संचालकांची आवश्‍यकता आहे. त्‍यामुळे सभेचा काेरम पूर्ण करण्‍यासाठी फोडाफोडीचे राजकारण होणार का? याकडे आता जिल्‍ह्याचे लक्ष लागले आहे.

गोकुळ निवडणुकीत आ. सतेज पाटील यांनी सर्वसामान्‍य कार्यकर्ते यांना उमेदवारी देत निवडून आणले. त्‍यामुळे दगाफटका होण्‍याची शक्‍यता धूसर आहे. दरम्‍यान, आ. पाटील यांनी महायुतीचे उमेदवार साथ देतील असे, तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी आत्ता काही गडबड करणार नाही, असे वक्‍तव्‍य केल्‍याने चेअरमन निवड शांततेत होणार का, याकडे जिल्‍ह्याचे लक्ष असणार आहे.

महायुतीच्‍या रणनीतीकडे लक्ष

महायुतीच्‍या तीन संचालकांबाबत सध्‍या गोकुळच्‍या राजकारणात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. त्‍यामुळे चेअरमन निवडीदरम्‍यान महायुतीचा संचालक आ. पाटील यांच्‍या गळाला लागणार का, याकडेही लक्ष असेल. तसेच चेअरमन निवडीबाबत महायुतीच्या नेत्‍यांची २८ ऑक्‍टोबरला बैठक होत आहे. यामध्‍ये महायुतीची चेअरमन निवडीसंदर्भातील रणनीती ठरणार आहे.

दोन्‍ही आघाड्यांकडून खबरदारी

संचालक फोडाफोटीचा धोका असल्‍याने दोन्‍ही आघाड्यांकडून खबरदारी घेतली जात आहे. ‘समविचारी’चे संचालक सहलीवर गेले आहेत. मात्र, सहलीच्‍या ठिकाणाबाबत गोपनीयता बाळगण्‍यात आली आहे. तर महायुतीचे संचालकही लवकरच सहलीसाठी रवाना होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT