कोल्हापुरात नवा राजकीय पट Pudhari File Photo
कोल्हापूर

Political News | कोल्हापुरात नवा राजकीय पट

पुढारी वृत्तसेवा

चंद्रशेखर माताडे, कोल्हापूर

उद्धव ठाकरे व राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले. एकत्र आलो, एकत्र रहाण्यासाठी आलो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उद्धव सेना आता महाविकास आघाडीबरोबर रहाणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना व काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी यांचे आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र येणे नव्या राजकीय पटमांडणीची सुरुवात हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

राज्यात महाविकास आघाडी नव्हती तेव्हा कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना अशी महाविकास आघाडी अस्तित्वात होती. जिल्हा परिषदेत पहिली अडीच वर्षे अध्यक्षपद भाजपकडे, तर उर्वरित अडीच वर्षांसाठी काँग्रेसकडे अध्यक्षपद राहिले. महापालिका पाच वर्षे व जिल्हा परिषदेत गेली तीन वर्षे प्रशासकीय राजवट आहे. दरम्यानच्या काळात राजकीय परिस्थितीत मोठे बदल झाले आहेत. काँग्रेसला लोकसभेला एका जागेवर विजय मिळाला असला तरी लोकसभेचे एक व राज्यसभेचे एक खासदार हे अनुक्रमे शिंदे सेना व भाजपचे आहेत. तर दहाही आमदार महायुतीचे आहेत. विधानपरिषदेचे दोन आमदार काँग्रेसचे आहेत.

कोल्हापूर महापालिकेचे कार्यक्षेत्र असलेल्या कोल्हापूर उत्तर व कोल्हापूर दक्षिणचा काही भाग या मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या आहेत. माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला.

तर भाजपची चाचपणी सुरू आहे. पडद्यामागे होणार्‍या हालचाली मोठ्या आहेत. काँग्रेस-स्वाभिमानीची राजकीय जवळीक त्याचवेळी महाविकास आघाडीकडून शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात हा महामार्ग जात असलेल्या जिल्ह्यातून आंदोलन सुरू आहे. यामध्ये काँग्रेस नेते आघाडीवर आहेत. तर शेतकर्‍यांचा प्रश्न असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आक्रमकपणे यामध्ये उतरली आहे. यातून काँग्रेस पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील जवळीक वाढली आहे. यातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राजकीय जवळीकही वाढू शकते. महाविकास आघाडीत ठाकरे शिवसेना राहणार का, याची चर्चा असताना स्थानिक पातळीवर मात्र आपापसातील सोय पाहून जवळीक होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT