Kolhapur political  News
विधानपरिषद निवडणूक 
कोल्हापूर

विधानपरिषद निकालानंतर नवी राजकीय समीकरणे

पुढारी वृत्तसेवा
चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीची चुरस शिगेला गेली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निकालानंतरच राज्यात सत्तांतर झाले होते. आता विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर असताना होत असलेल्या राज्य विधानपरिषदेच्या निवडणुकीला कमालीचे महत्त्व आले आहे. नव्या राजकीय जोडण्या व नवी राजकीय समीकरणे आकाराला येण्याची चर्चा सुरू असली तरी विधानपरिषदेच्या निकालानंतरच त्याला वेग येणार आहे. तसेच पुढची राजकीय दिशाही यातूनच ठरणार आहे.

जून 2022 मध्ये झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीने राज्यात सत्तांतर घडवून आणले होते. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीला दणका देताना महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणत ही महाराष्ट्रातील नव्या परिवर्तनाची नांदी असल्याचे म्हटले होते. काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे पराभूत होऊन भाई जगताप निवडून आले होते. सरकार असतानाही महाविकास आघाडीची 21 मते फुटली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले होते.

आता विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे कोण येणार यापेक्षा कोण पडणार याचीच चर्चा सर्वाधिक आहे. या निकालावर राज्यातील पुढची राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. सध्या राज्यात नव्या युती, आघाड्यांची चर्चा सुरू आहे. संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य संघटना कोल्हापूर वगळता राज्यात विधानसभा निवडणुकीत सक्रिय होणार आहे. कोल्हापूर वगळून राज्यात स्वराज्यला पर्याय खुले असतील, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे. अलीकडेच स्वराज्य संघटनेने आयोजित केलेल्या कार्यकर्ता शिबिरात प्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू उपस्थित होते. त्यांनी तिसर्‍या आघाडीबाबत वक्तव्य केल्यानंतर त्याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले होते. तेथूनच स्वराज्य व प्रहार संघटना एकत्रित येणार असल्याची चर्चा सुरू झाली. याचदरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. मात्र तूर्त तरी हे सगळे चर्चेच्या पातळीवरच आहे. विधानपरिषदेचा निकाल काय सांगतो यावरच पुढचे राजकीय चित्र आकाराला येणार आहे.

विधानपरिषद निकालाकडे लक्ष : शेट्टी

विधानपरिषदेचा निकाल काय लागतो याकडे आमचे लक्ष असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. स्वाभिमानी व वंचित एकत्र येणार असल्याची चर्चा असली तरी व्यापक पातळीवर हे ऐक्य घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सांगून ते म्हणाले, स्वाभिमानी, वंचित बहुजन आघाडी, बच्चू कडू यांची प्रहार संघटना, बीआरएसचे शंकरराव धोंडगे, शरद जोशी यांची शेतकरी संघटना एकत्र करण्याचे प्रयत्न आहेत, पण विधानपरिषद निकालानंतर त्याला गती येईल. स्वाभिमानी व वंचित एकत्र यायचे असेल तर स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे मनोमीलन झाले पाहिजे, ते झाले तर पुढची वाटचाल सोपी होईल, असे आपण आंबेडकर यांच्याशी झालेल्या भेटीत सांगितल्याचेही शेट्टी म्हणाले.

SCROLL FOR NEXT