सतीश सरीकर
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची निवडणूक भाजप महायुती म्हणूनच लढणार हे स्पष्ट आहे; परंतू सर्वाधिक नगरसेवक निवडून यावेत यासाठीही भाजपचे नेते रणनीती आखत आहे. त्यासाठी जातीय-धार्मिक गणितांचा अभ्यास केला जात आहे. उमेदवारही त्याद़ृष्टीनेच विचार करत आहेत. परिणामी, शत-प्रतिशत भाजपसाठी ताराराणी आघाडीला ऊर्जितावस्था येण्याची दाट शक्यता आहे. त्यातून कोल्हापूर महापालिकेसाठी नवे राजकीय गणित मांडले जाणार आहे.
जातीय-धार्मिक समीकरणे
इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानात उतरण्याआधीच राजकीय गणितांची मांडणी सुरू केली आहे. कोणत्या पक्षातून निवडणूक लढविल्यास विजयाची शक्यता अधिक आहे, कोणत्या पक्षाच्या उमेदवारीमुळे किती मते मिळतील अथवा दुरावतील, याची सखोल चाचपणी प्रत्येक प्रभागात सुरू आहे. यात जातीय, धार्मिक व स्थानिक गटांची समीकरणे अत्यंत महत्त्वाची ठरत असल्याचे चित्र आहे.
रणनीतीपूर्ण पाऊल
विशेषतः काही प्रभागांमध्ये मुस्लीम मतदारांचे प्रमाण निर्णायक असल्याने अनेक इच्छुक भाजपच्या उमेदवारीबाबत साशंक आहेत. भाजपची उमेदवारी घेतल्यास मुस्लीम मते मिळणार नाहीत, अशी धारणा काही ठिकाणी घट्ट रुजलेली आहे. त्यामुळे निवडणूक जिंकायची असेल तर पर्यायी पक्ष किंवा आघाडी शोधावी लागेल, असा सूर इच्छुकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने विशेषतः खासदार धनंजय महाडिक यांनी एक वेगळे आणि रणनीतीपूर्ण पाऊल टाकल्याचे संकेत मिळत आहेत.
ताराराणी आघाडी राहणार ‘बी टीम’
भाजपची थेट उमेदवारी नको असलेल्या; मात्र तुल्यबळ व निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना ताराराणी आघाडीची उमेदवारी घेण्याचे सूतोवाच खा. महाडिक यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. वरकरणी स्वतंत्र वाटणारी ही आघाडी प्रत्यक्षात भाजपचीच ‘बी टीम’ म्हणून काम करेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे भाजपची थेट प्रतिमा नको असलेले मतदार सांभाळले जातील आणि दुसरीकडे महापालिकेवर भाजपपुरस्कृत सत्ता आणण्याचा मार्ग सुकर होईल, असे हे दुहेरी गणित आहे.
एकत्रित शक्तिकेंद्र...
ताराराणी आघाडीचा कोल्हापूरच्या राजकारणातील इतिहास पाहिला, तर तिचे महत्त्व अधोरेखित होते. 2015 च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे 13 नगरसेवक निवडून आले, तर ताराराणी आघाडीचे तब्बल 19 नगरसेवक विजयी झाले होते. हा अनुभव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि ताराराणी आघाडी हे एकत्रित शक्तिकेंद्र उभे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते.
ताराराणी आघाडीचा सेफ रूट...
यापूर्वी विसर्जित झालेली ताराराणी आघाडी पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्याचे संकेत आता खा. महाडिक देत आहेत. हे केवळ निवडणूकपूर्व गणित नाही, तर निवडणुकीनंतरच्या सत्ता समीकरणांचीही तयारी आहे. भाजपची थेट उमेदवारी घेऊन जिथे विजय कठीण आहे, तिथे ताराराणी आघाडीचा ‘सेफ रूट’ (सुरक्षित मार्ग) वापरण्याचा फॉर्म्युला आखला जात आहे. या रणनीतीमुळे भाजपला अनेक फायदे होऊ शकतात. एकीकडे भाजपवर थेट टीका करणारे अथवा भाजपविरोधी मानसिकता असलेले मतदार ताराराणी आघाडीच्या नावाखाली आकर्षित होतील. निवडणुकीनंतर हेच नगरसेवक भाजपला पाठिंबा देतील.
सत्ता समीकरणातील कणा
भाजपला शत-प्रतिशत सत्ता आणायची असल्यास थेट आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही मार्गांचा वापर करण्याची तयारी सुरू आहे. त्यात ताराराणी आघाडी ही केवळ पूरक शक्ती नसून भाजपच्या सत्ता समीकरणातील एक महत्त्वाचा कणा ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
महाडिक गटाचा दबावगट
ताराराणी आघाडीचे 15 ते 20 नगरसेवक निवडून आले, तर महाडिक कुटुंबाचा महापालिकेत एक स्वतंत्र आणि प्रभावी दबावगट तयार होईल. हा दबावगट केवळ महापालिकेतील निर्णयांपुरता मर्यादित राहणार नाही, तर भाजपच्या शहर व जिल्हा पातळीवरील राजकारणावरही त्याचा प्रभाव राहील. परिणामी, भाजपवरही महाडिक यांचे वर्चस्व अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे.