सुनील कदम
कोल्हापूर : पुणे - बंगळूर महामार्गासाठी शिरोली ते पंचगंगा पुलादरम्यान टाकण्यात आलेला भराव महापुराला कारणीभूत ठरतो, म्हणून काढून टाकण्यात येणार आहे. पण आता नव्याने या भरावाच्या उंचीइतक्याच उंचीचे नवीन गटारीचे बांधकाम या ठिकाणी सुरू झाले आहे. हे नवीन गटार म्हणजे भविष्यात पंचगंगेला घातलेला नवा बांध ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महामार्गाचा महापुराला हातभार!
महामार्गाचे बांधकाम करताना शिरोली ते पंचगंगा पुलाच्या दरम्यान जवळपास १२ ते १५ फुटांचा भराव टाकण्यात आलेला आहे. हा भराव म्हणजे एक प्रकारे पंचगंगा नदीला घातलेला बांध ठरत असून हा बांध कोल्हापुरातील महापुराला हातभार लावायला कारणीभूत ठरत आहे. अनेक तज्ज्ञांनी आणि अभ्यासकांनी तसे स्पष्ट मत नोंदविलेले आहे.
गटारीचा नवा बांध!
असे असताना सध्या या महामार्गाच्या पश्चिम बाजूला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे नव्याने बंदिस्त गटारीचे काम सुरू करण्यात आलेले आहे. या गटारीची उंची जवळपास महामार्गाच्या जुन्या भरावाइतकीच आहे. हे म्हणजे जुन्या भरावाचा एक बांध काढून गटारीचा नवा बांध तयार करण्याचाच प्रकार म्हणायला हवा. महापुराला कारणीभूत ठरणारा किंवा हातभार लावणारा एक बांध काढून टाकून तसलीच नवी तटबंदी गटारीच्या रूपाने या ठिकाणी उभारण्याचे काम सुरू असलेले दिसत आहे. त्यामुळे मूळ हेतूच बाजूला पडण्याचा धोका आहे. या ठिकाणी असलेला महामार्गाचा भराव का काढून टाकायचा आहे, तर भविष्यात कधी पंचगंगेला महापूर आला तर महापुराचे पाणी पूर्वीप्रमाणे लगेचच महामार्गाच्या पलीकडे जाऊन महापूर ओसरायला मदत व्हावी म्हणून! पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या ठिकाणी भरावाच्या उंची इतकेच नवे गटार बांधून महापुराला हातभार लावणारे नवे कारण तयार करीत आहे, असेच म्हणावे लागेल.
अधिकाऱ्यांची सारवासारव!
ही नवीन गटार आणि तिच्या धोकादायक उंचीबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी जुना भराव काढून टाकणार असल्याच्या मागणीला दुजोरा दिला. तसेच गटारीच्या बांधकामाची उंची आपण कमीत कमी ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण उघड्या डोळ्यांनी बघितले तरी या नव्या गटारीची उंची जुन्या भरावाइतकीच असल्याचे दिसून येते. मुळात या ठिकाणी गटार बांधण्याची आवश्यकता नाही. कारण महामार्गाच्या दोन्ही बाजूकडे असलेल्या ओघळीतून महामार्गावरील पावसाचे पाणी वर्षानुवर्षे वाहून जातेच आहे. त्यामुळे पंचगंगेवर उभी राहात असलेली ही नवी तटबंदी रद्द करावी, अशी या भागातील नागरिकांची व तज्ज्ञांची मागणी आहे.
उड्डाणपूल बनविण्याचे काम सुरू
दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांनी ही बाब केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून देऊन हा भराव काढून टाकून या ठिकाणचा महामार्ग उड्डाणपुलावरून नेण्याची मागणी केली होती. गडकरी यांनी ही मागणी मान्य करून नवा महामार्ग उड्डाणपुलावरून करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. या आदेशानुसार सध्या या मार्गावर उड्डाणपूल बनविण्याचे कामही सुरू आहे. उड्डाणपुलाचे काम करीत असतानाच जुना भराव काढून टाकण्याचे नियोजन आहे.